

बेळगाव : होळीचा सण सोमवारी (दि. 2) साजरा होत असून मंगळवारी (दि. 3) शहरात रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. या पृष्ठभूमीवर शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मद्य पिऊन धिंगाणा घालणारे तसेच कर्णकर्कश डीजे लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला आहे.
ते म्हणाले, होळी सणाच्या बंदोबस्तासाठी 180 पोलिस अधिकारी व एक हजारहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. शहरात 250 होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या सात तुकड्या, केंद्रीय राखीव दलाच्या दहा तुकड्या, अग्निशामक दल, एसडीआरएफ तैनात करण्यात येणार आहेत. शहरामध्ये 19 ठिकाणी चेक पोस्ट करण्यात येणार आहेत. तर 500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत.
मंगळवारी रंगपंचमी असून सर्वांनी शांततेत रंगोत्सव साजरा करावा. बारावीची परीक्षा असून विद्यार्थ्यांना कुणीही रंग लावू नये. महत्त्वाचे म्हणजे मद्य पिऊन दंगा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कर्णकर्कश डीजे लावण्यावर बंदी असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.