

बेळगाव : रिअल इस्टेट एजंटच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न झाला. चौघांच्या टोळीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगरमध्ये बुडा कार्यालयाच्या बाजूला असलेल्या आसदखान सोसायटीत भरदुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची मार्केट पोलिसांत नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी व घरमालक मैनुद्दिन पठाण यांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी दुपारी त्यांची मुले नमाज पठणासाठी गेली होती. यावेळी घरी ते पत्नी व मुलीसमवेत होते. चौघेजण अचानक घरात घुसून हिंदीमध्ये मैनुभाई कुठे आहे, असे म्हणत स्वयंपाक घरात घुसले. तेथे असलेल्या मैनुद्दिन, त्यांची पत्नी व मुलीला एकत्रित थांबवून त्यांच्या डोकीजवळ बंदूक ताणली. या सर्वांकडे पिस्तूल असल्याचा दावा मैनुद्दिन यांनी केला आहे. यानंतर तुम्हाला काय हवे, असे विचारले असता गप्प बस असे म्हणत एकाने मैनुद्दिन यांच्या पोटात लाथ घालत कपाळावर बंदूक पकडलेल्या मुठीने बुक्का मारला. तरीही हे तिघेजण दंगा करु लागल्याने या सर्वांना बाथरुममध्ये कोंडून घातले. पठाण यांनी बाथरुमच्या खिडकीच्या काचा काढून तेथून आरडाओरडा सुरु केला. वाचवा... वाचवा... असे जोरजोराने ओरडू लागल्याने लोक येण्याच्या भितीने हे सर्वजण पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच बाजूलाच राहणारे नगरसेवक मुजम्मील डोणी यांनी पोलिसांना बोलावून घेतले. क्राईमचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, माळमारुतीचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, मार्केटचे उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर यांच्यासह अन्य अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. घरमालकाच्या म्हणण्यानुसार संशयित पाचजण होते. परंतु, पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता चौघे आढळून आले.