

बेळगाव : अथणी शहरामध्ये हुलगबाळ रोड स्वामी प्लॉट येथे तीन जणांच्या टोळीकडून दोन चिमुकल्यांचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. यानंतर अपहरणकर्त्यांचा पोलिसांनी पाठलाग सुरू केला पण आरोपींनी पोलिसावरच हल्ला केल्याने पोलिसांनी संरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात एक आरोपी जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.२४) घडली. जखमी झालेल्या संशयिताला अथणी येथील शासकीय रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास चालविला आहे. मात्र, मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीमुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी (दि.24) दुपारी एका कारमधून तिघेजण अथणी येथील हुलगबाळ रोड स्वामी प्लॉट परिसरात आले होते. कार रस्त्याच्या कडेला उभी करून दोघेजण खाली उतरले. त्यानंतर त्यांनी परिसरातील घरामध्ये टेहळणी करण्यास सुरू केली. घरात कोणी नसल्याचे पाहून दोन अल्पवयीन बालकांचे अपहरण करून त्यांना कारमध्ये घेऊन पलायन करण्यास सुरूवात केली. ही माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. तात्काळ पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या कारचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. मात्र, यावेळी अपहरणकर्त्यांनी पोलिसावर हल्ला केल्याने पोलिसांनी स्वक्षणार्थ केलेल्या गोळीबारात एकजण जखमी झाला. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन बालकांची सुटका करण्यात आली. घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.