

बेळगाव : क्षुल्लक रकमेच्या आर्थिक व्यवहारासाठी बेकायदेशीररीत्या घरात घुसून तरुणासह त्याच्या वडिलांवर हल्ला केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री तालुक्यातील बसवनकुडची येथे घडली. याप्रकरणी माळमारुती पोलिसांनी सहा जणांच्या टोळक्याला अटक केली.
याबाबत माहिती अशी : बसवन कुडची येथील अरिहंत कल्लाप्पा पाटील यांच्या घरावर सात जणांच्या टोळक्याने हल्ला केला. अरिहंत यांच्यासह त्याच्या वडिलांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यांच्या घराच्या दरवाजावर पेट्रोल ओतत घर जाळण्याचा प्रयत्न केला. शिवाय कल्लाप्पा पाटील यांना दुचाकीवर बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. अरिहंत पाटील यांनी हल्लेखोरांकडून कबूतर खरेदी केले होते. याची 1500 रुपयांची रक्कम देणे होती. यातूनच चिडलेल्या सात जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. याप्रकरणी अरिहंत यांनी माळ मारुती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून एक जण फरारी आहे.
अटक केलेल्या संशयीतांमध्ये श्रीधर बाहुबली देसाई 19 बस्तवाड, आकाश भरतेश पाटील 19 बस्तवाड, विवेक देवेंद्र देसाई, 22 विजयनगर हलगा, तवनेश माणिक गोमाजी 21 बस्तवाड, प्रतीक माणिक पाटील 19 बस्तवाड व देवेंद्र लहू पाटील, 22 विद्यानगर बस्तवाड यांचा समावेश आहे. या सर्वांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता कारागृहात रवानगी करण्यात आली.