

अथणी : शहर गाढ झोपेत असताना जत रस्त्यावरील मॉलला भीषण आग लागली. रविवारी पहाटे ३.३० वाजता लागलेल्या आगीत काही मिनिटांत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय असून यामध्ये सुमारे तीन कोटी रूपये नुकसान झाले आहे. दसरा सणाच्या तोंडावर मालक अभिजीत शिंदे (रा. मिरज) व मारुती माळी (रा. नरवाड) यांना आर्थिक फटका बसला आहे. याबाबत अथणी पोलिसांत नोंद झाली आहे.
अथणी शहरात ब्रह्मा एंटरप्रायझेस नावाचा मॉल आहे. रविवारी मध्यरात्री अचानक या मॉलमधून धूर येऊ लागला. पाहतापाहता आगीने संपूर्ण मॉलला विळखा घातला. यामध्ये मॉलमधील सोफा, पलंग, टीव्ही, फ्रीज, महागडे कपडे आदी साहित्य जळून खाक झाले. मॉलला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. या घटनेची माहिती मिळताच अथणी व कोकटनूर रेणुका शुगर येथील अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सुमारे ३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. मात्र या आगीत मॉल बेचिराख झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार या घटनेत 3 कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
२०१२ मध्ये येथील स्वामी कलेक्शन नावाचे दुकान जुळून खाक झाले होते. त्यानंतर शहरातील ही दुसरी घटना आहे. या मॉलला लागून सुपर बाजार नावाचे दुकान आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणल्यामुळे या दुकानाला फटका बसला नाही.
...तर शंभर दुकाने खाक झाली असती
आग नेमकी कशी लागली, याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. आग लागल्याचे लक्षात येताच येथील सुरक्षा रक्षकाने तातडीने याची माहिती अग्निशामक दलाला दिली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा बसवेश्वर सर्कलपासून ते महात्मा जोतिबा फुले चौकापर्यंत शंभर दुकाने जळून खाक झाली असती.