

निपाणी : येथील अशोकनगर जागेप्रकरणी माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या संघटनेने अखंडपणे पाठपुरावा सुरु ठेवला आहे. बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पालकमंत्री सतीश जारकिहोळी, नगरविकास मंत्री भैरती सुरेश, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली आहे. याकामी लवकरच कारवाई करण्याचे संकेत देण्यात आल्याची माहिती माजी सभापती किरण कोकरे यांनी दिली.
माजी नगरसेवक संघटनेतर्फे गुरुवारी (दि. 8) सायंकाळी डाकबंगल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चिंगळे यांच्या नेतृत्वाखाली गोकाकमध्ये मंत्री जारकिहोळी यांची भेट घेऊन जागेच्या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून संबंधित अधिकार्यांना सूचना करण्याची ग्वाही दिली. जिल्हाधिकारी रोशन यांनाही निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व नगरविकास मंत्री सुरेश यांनाही निवेदन दिले असून त्यांनी याबाबत जिल्हाधिकार्यांना सूचना केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
शासकीय पातळीवरून लवकरच आपल्याला न्याय मिळेल. याशिवाय पालिका आयुक्त दीपक हरदी यांना कारणे दाखवा नोटीस बजावले असून जिल्हाधिकार्यांनी बोलावून माहिती मागितल्यानंतर ते अनुत्तरित झाले आहेत. आमदार शशिकला जोल्ले पदसिद्ध नगरसेवक आहेत. अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचे सभागृह आहे. असे असताना अशी दुर्दैवी घटना घडली शक्य नसल्याचे कोकरे यांनी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, विजय शेटके, प्रवीण सडोलकर-भाटले, राजेंद्र चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष मुन्ना काझी, झाकीर कादरी, सभापती अल्लाबक्ष बागवान, बबन घाटगे, दिलीप जाधव, संदीप कामत, संदीप चावरेकर, धनाजी निर्मळे आदी उपस्थित होते.