Nipani News : नाथांच्या जयघोषात आप्पाचीवाडी येथे हालसिद्धनाथ यात्रेस उत्साहात प्रारंभ

ढोलवादनाचा गजर अन् भंडाऱ्याची उधळण, गुरुवारी संकष्टीच्या दिवशी मुख्य नैवेद्य सोहळा
आप्पाचीवाडी : खडक मंदिरात उत्सवस्थळी कुर्ली येथून निघालेली नाथांची पालखी मिरवणूक.
आप्पाचीवाडी : खडक मंदिरात उत्सवस्थळी कुर्ली येथून निघालेली नाथांची पालखी मिरवणूक.
Published on: 
Updated on: 

मधुकर पाटील

निपाणी : श्रीक्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ देवाच्या भोंब यात्रेस सोमवार, दि. २६ पासून उत्साहात प्रारंभ झाला. दरम्यान, ढोल-वादनाच्या निनादात या यात्रेस रंग भरू लागला असून शुक्रवारपर्यंत ही यात्रा चालणार आहे. सोमवारी दुपारी १:३० वाजता आप्पाचीवाडी येथील खडक मंदिरात रायबागचे प्रमुख मानकरी बागेवाडी बंधू यांच्या हस्ते कर बांधून यात्रेस प्रारंभ करण्यात आला.

सकाळी ९ वाजता घोडी, पालखी, ढोल, बँडच्या निनादात कुर्ली येथून हालसिद्धनाथांचे सर्व मानकरी आप्पाचीवाडीकडे रवाना झाले. वाड्यातील मंदिरापर्यंत कुर्लीतून निघालेली पालखी मिरवणूक आल्यानंतर, वाड्यातील हालसिद्धनाथांची उत्सवमूर्ती व पालखी खडक मंदिर उत्सवस्थळाकडे मानकऱ्यांसह दुपारी मिरवणुकीने रवाना झाली. या वेळी भव्य ढोलवादनाचा (वालंग) गजर, पोटावर तलवार मारण्याचा खेळ तसेच लोखंडी गोळे खेळण्याचा पारंपरिक कार्यक्रम पार पडला.

दरम्यान, उद्या मंगळवार, दि. २७ रोजी रात्री नाथांचे पारंपरिक कार्यक्रम होणार आहेत; तर बुधवार, दि. २८ रोजी रात्री (गुरूवारी पहाटे उजाडताना ५ वाजता) नाथांची भगवान डोणे (वाघापुरे) यांच्या मुखातून पहिली भाकणूक होईल. दि. २९ रोजी गुरुवारी या यात्रेचा मुख्य दिवस असून, या दिवशी नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे.

या दिवशी रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेत ढोलवादन, सबीना सोहळा, हत्यार मारून खेळणे आदी विधी पार पडतील. गुरुवारी मध्यरात्रीनंतर शुक्रवारी पहाटे नाथांची दुसरी व त्यानंतर सकाळी ७ वाजता घुमट मंदिर परिसरात तिसरी भाकणूक होणार आहे. या यात्रेसाठी आप्पाचीवाडी येथे कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश येथून हजारो भाविक दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात यात्रेनिमित्त लहान-मोठ्या विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत.

यंदा यात्रा काळात घुमट मंदिरातील पूजेचा मान अरुण पुजारी व अल्फाश मुल्लाणी यांच्याकडे, तर वाडा मंदिरातील पूजेचा मान बाजीराव पुजारी व खडक मंदिरातील पूजेचा मान बापुसो पुजारी यांच्याकडे आहे. यात्रेतील मानाची नवलिहाळ येथील हेगडे बंधूंची दुधाची घागर बुधवारी सायंकाळी ५ वाजता खडक मंदिरात आणण्यात येणार आहे.

नाथांच्या या यात्रेतील भाकणुकीतून देश-विदेशातील राजकीय, आर्थिक व नैसर्गिक परिस्थितीचे भाकीत वर्तविले जाते. त्यामुळे भाकणूक हेच यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले आहे. पाच दिवस चालणारी ही यात्रा भाविकांनी शांततेत व सुरळीत पार पाडावी, असे आवाहन यात्रा कमिटी अध्यक्ष शिवाजी जाधव, सदस्य, माजी ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासन व ग्रामस्थांनी केले आहे. दरम्यान, यात्राकाळात सीपीआय बी. एस. तळवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांनी वाहतूक व्यवस्थेसह चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

यंदा संकष्टीच्या दिवशी नैवेद्य...

यात्रा काळात येणारा नैवेद्याचा दिवस हा बहुतांश वेळा संकष्टीचा असतो. यंदाही गुरुवार, दि. २९ रोजी संकष्टी आहे; त्यामुळे या दिवशी भाविकांकडून नाथांना नैवेद्य अर्पण केला जाणार आहे.

दरवर्षी नाथांच्या यात्रेला भूमिपूजनाच्या दिवशी म्हणजेच आश्विन नक्षत्रावर पौर्णिमेला सुरुवात होते. मात्र यंदा पौणिमा रविवार, दि. २५ रोजी समाप्त झाली. तरीही पारंपरिक चालीरीतीप्रमाणे आश्विन नक्षत्रावर, पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी या यात्रेला नित्यनियमाने सुरुवात झाली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात भूमिपूजनाच्या दिवशीच या यात्रेला सुरुवात होते, हे या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news