

बंगळूर : राजकारण्यांचे हनीट्रॅप प्रकरण गाजत असतानाच एका खासगी अंगणवाडी शिक्षिकेने शाळेत येणार्या मुलांच्या पालकांना जाळ्यात हेरल्याची घटना घडली आहे. पालकांकडून तिने लाखो रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तिच्यासह प्रियकर आणि एका गुंडाला अटक करण्यात आली आहे.
उद्योजकर राजेश यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शिक्षिका श्रीदेवी रुडगी (25), तिचा प्रियकर सागर मोरे (28) आणि गुंड गणेश काळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही संशयित मूळचे विजापूरचे आहेत. गणेश हा गुंड असून त्याच्याविरुद्ध विविध 9 पोलिस ठाण्यांमध्ये धमकी, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत.
खासगी अंगणवाडीत शिक्षिका असणार्या श्रीदेवीने 2023 मध्ये उद्योजक राकेश यांच्याशी ओळख करुन घेतली. शाळेची देखभाल, वडिलांच्या उपचारासाठी तिने त्यांच्याकडून 4 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मार्च 2024 मध्ये ते फेडण्याचे तिने सांगितले होते. याबाबत तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने टाळाटाळ सुरु केली. आर्थिक चणचण, कौटुंबिक अडचणी तिने सांगण्यास सुरुवात केली. पैसे देणे शक्य होणार नाही. शाळेमध्ये तुम्हीही भागीदार असल्याचे तिने राकेश यांना सांगितले.
या भागीदारीतून त्यांची ओळख वाढू लागली. काही ठिकाणी ते एकमेकांसोबत फिरले. तिच्यासोबत बोलण्यासाठी राकेश यांनी वेगळा मोबाईल आणि सिमकार्ड घेतले होते. पण, जानेवारी 2025 मध्ये राकेश यांनी पुन्हा एकदा पैशांची मागणी केली. पण, श्रीदेवीने त्यांना पैसे नसल्याचे सांगितले. त्यापेक्षा आणखी 15 लाख रुपये दिल्यास सोबतच राहीन, असे तिने सांगितले. पण, राकेश यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर श्रीदेवीने काही व्हिडिओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. वारंवार पैसे मागण्यास सुरुवात झाल्याने राकेशने मोबाईल बंद केला. तिच्याशी संपर्क तोडला. या घटनेनंतर श्रीदेवीने मित्रासोबत राकेशला लुटण्याचा कट आखला. गेल्या 12 मार्च रोजी राकेशच्या पत्नीला श्रीदेवीने फोन केला. मुलाचे ट्रान्स्फर सर्टिफिकेट द्यायचे असून राकेश यांना पाठवण्याचे तिने सांगितले. त्यानुसार ते अंगणवाडीत गेले. त्यावेळी तेथेच असणारे सागर आणि गणेश यांनी राकेश यांना धमकावले. श्रीदेवीचा साखरपुडा सागरशी झाला तरी तिच्यासोबत फिरत असल्याबाबत गणेशने राकेशला धमकावले.
हे सर्व प्रकरण मिटवण्यासाठी तिघांनी राकेश यांच्याकडे 1 कोटी रुपये मागितले. त्यांना कारमधून नेले. जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर 20 लाखांवर त्यांचा व्यवहार ठरला. राकेशने कसेबसे त्यांना तात्काळ 1.90 लाख रुपये दिले आणि त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतली. त्यानंतर त्यांनी सीसीबी पोलिसांत तक्रार दिली.