

चिकोडी : सध्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे सीमाभागातील कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. नद्यांचे पाणी वाढू लागल्याने यंदाही कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव जिल्ह्यांवर महापुराचे संकट येणार का, अशी भीती वर्तवली जात आहे. मात्र तूर्तास अलमट्टी जलाशय रिकामे असल्याने या तिन्ही जिल्ह्यांना महापुराचा कोणताही धोका नसल्याचे दिलासादायक चित्र आहे.
भौगोलिक परिस्थितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी राजापूर बंधाऱ्यानंतर कर्नाटकातील हिप्परगी बंधारा आणि अलमट्टी धरणात जाते. जेव्हा हिप्परगी बंधारा आणि अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरतात, तेव्हा पाण्याचा फुगवटा (बॅकवॉटर) निर्माण होऊन कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होते. यंदा मात्र जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे हिप्परगी बंधारा आणि अलमट्टी धरण अजूनही पूर्णपणे रिकामे आहे.
धरणातील सद्यस्थिती काय?
अलमट्टी धरणाची एकूण साठवण क्षमता १२३.०८१ टीएमसी असून, धरणाची पाणी पातळी क्षमता ५१९ मीटर आहे. सध्या या धरणात केवळ २०.६८९ टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. यातील 'डेड स्टोरेज' (वापरात न येणारे पाणी) वजा केल्यास, प्रत्यक्षात फक्त ३.०६ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही तब्बल १०० टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. सध्या धरणातून १०० क्युसेक इतकाच नाममात्र विसर्ग सुरू आहे.
तूर्तास दिलासा, सतर्कता आवश्यक
अलमट्टी धरण पूर्ण भरण्यासाठी १०० टीएमसी पाण्याची गरज असल्यामुळे, पश्चिम महाराष्ट्रात कितीही पाऊस झाला तरी हे पाणी थेट अलमट्टीत सामावून घेतले जाईल. परिणामी, पाण्याचा फुगवटा निर्माण होणार नाही, सांगली-कोल्हापूरला पुराचा फटका बसणार नाही. नद्यांची पातळी वाढत असली, तरी अलमट्टी रिकामे असल्याने बेळगाव, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांना सध्या तरी महापुराचा कोणताही धोका नाही. मात्र, आगामी काळातील पावसाचा जोर पाहता प्रशासनाने खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.