

बेळगाव : पावसाचा जोर कमी झाल्यामुळे अलमट्टी जलाशयात पाण्याची आवक कमी झाली आहे. तरी यंदा ऑगस्ट महिन्यातच जलाशय तुडुंब झाले आहे. जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यासाठी केवळ अर्धा टक्के पाण्याची गरज आहे. दोन दिवसांत जलाशय पूर्ण क्षमतेने भरणार असून जलाशय प्रशासनाने गंगापूजनाची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे.
मे महिन्यापासूनच जलाशयात पाण्याची आवक होत होती. त्यामुळे, सर्व पाणी अडविले असते तर जूनमध्येच जलाशय भरले असते. पण, केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात आली आहे. आताही मार्गदर्शक सूचनांनुसारच जलाशय भरण्यात येणार आहे. 19 मे रोजी जलाशयात पहिल्यांदाच आवक खूप लवकर सुरु झाली होती, त्यामुळे, 30 मे रोजी जलाशयातून पाणी सोडण्यात आले. जलाशय अर्धे भरण्यापूर्वीच नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. जलाशयात येणारे पाणी आणि नदीपात्रात सोडण्यात येणार्या पाण्याबाबत योग्य खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे. पूरस्थिती निर्माण झाली नाही. केबीजेएनएलच्या (कृष्णा भाग्य जल निगम लिमिटेड) अधिकार्यांनी खबरदारीचे उपाय केल्यामुळे, यावेळी जलाशयाच्या मागील आणि समोरील जमिनीत पाणी सोडण्यात आले.
जलाशय आता पूर्ण क्षमतेने भरणार असल्यामुळे गंगापूजन करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव दिला आहे. अलमट्टी जलाशयात सर्वाधिकवेळा गंगापूजन करण्याचा मान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना जाणार आहे. 2013 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनी 2013, 2014 आणि 2017 मध्ये तीनवेळा अलमट्टीत गंगापूजन केले आहे. दुसर्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी 2023 आणि 2024 मध्ये त्यांनी गंगापूजन केले आहे. आता यावेळीही तेच गंगापूजन करणार आहेत. येडियुराप्पा आणि सिद्धरामय्या दोघांनीही प्रत्येकी पाच वेळा गंगापूजन केले आहे. यावेळी सिद्धरामय्या सहाव्यांदा गंगापूजन करणार आहेत.
जलाशयात 519.57 मीटरपर्यंत पाणी साचले आहे. जलाशयात 14,860 क्युसेकची आवक आहे आणि नदीपात्रात 10,000 क्युसेक पाणी सोडले जात आहे. जलाशयाची साठवण क्षमता 123.081 टीएमसी इतकी आहे. जलाशयात 122.483 टीएमसी इतके पाणी साचले आहे. जलाशय भरण्यासाठी फक्त अर्धा टीएमसी फूट पाणी शिल्लकआहे.
जलाशय जवळजवळ भरले आहे. गंगापूजन करण्यासाठी सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रस्ताव दिला आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गंगापूजन होण्याची शक्यता आहे.
डी. बसवराज, केबीजेएनएलचे मुख्य अभियंता