

बेळगाव : सप्तपदी न झाल्याने हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह झाला नसल्याचे कारण जिल्हा कौटुंबिक न्यायालयाने एका महिलेची पोटगी व घटस्फोटाची याचिका फेटाळून लावली. पहिल्या अतिरिक्त जिल्हा कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश संजय गुडगुदी यांनी नुकताच हा निकाल दिला.
आधी लग्न करायचे. त्यानंतर नवर्याला मानसिक त्रास द्यायचा आणि त्याच्याकडून रक्कम उकळायची असे प्रकार वारंवार घडत आहेत. काही महिलांनी तर तीन ते चार लग्ने करुन अनेकांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला होता. एका उच्चशिक्षित महिलेने धारवाडमधील एका सरकारी नोकरदाराशी आपला विवाह झाल्याचे सांगत येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट आणि पोटगीसाठी दावा दाखल केला होता.
मुळात सरकारी नोकरी असलेल्या संबंधित व्यक्तीचा विवाह यापूर्वीच एका महिलेची झाला होता. तिच्यापासून त्याला दोन मुलेही आहेत. काही कारणामुळे पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे, आधीच्या पत्नीने न्यायालयात दावा दाखल केला. त्या दाव्याला स्थगिती मिळाली आहे. असे असताना चक्क एका दुसर्या महिलेने त्याच्याशी आपला विवाह झाला असून मला पोटगी किंवा घटस्फोट द्यावा अशी मागणी करत जिल्हा कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. त्या महिलेच्या वकिलांनी न्यायालयासमोर तिची बाजू भक्कमपणे मांडली.
मात्र, प्रतिवादीचे वकील सिद्धार्थराजे सावंत यांनी न्यायालयासमोर व्यक्तिवाद करताना सप्तपदी झाली नसल्याने हा विवाह झाला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने हिंदू विवाह कायद्यानुसार सप्तपदी झाली नसल्याने तू त्याची पत्नी नाहीस. त्यामुळे, पोटगी किंवा घटस्फोट देण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत तिचा दावा फेटाळून लावला.
हिंदू विवाह कायद्यानुसार वधूवरांनी विवाहावेळी अग्निचे सात फेरे मारणे महत्वाचे आहे. सात फेरे म्हणजेच सप्तपदी झाली तरच विवाह झाल्याचे ग्राह्य मानले जाते. सप्तपदी झालेली नसल्यास कायद्यानुसार विवाह झाला नसल्याचे समजले जाते. तेच न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचे अॅड. सावंत यांनी सांगितले.