

निपाणी : पुढारी वृत्तसेवा
निपाणी नजीकच्या अकोळ येथे अज्ञाताने आईसह मुलाची धारदार कोयत्याचे वार करत हत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.5) सकाळी उघडकीस आली. मंगल सुकांत नाईक (वय. 46) आणि प्रज्वल सुकांत नाईक (वय. 20) असे मृतांचे नाव आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला निपाणी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हत्याकांडामुळे परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख डॉ.भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख श्रुती रामगोंडा बसरगी, डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी.एस.तळवार, उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मंगल नाईक आणि त्यांचा मुलगा हे प्रज्वल नाईक हे दोघेही अकोळ येथील बाळोबामाळ परिसरातील शेतामध्ये वास्तवास होते. दरम्यान बुधवारी रात्री 10 च्या सुमारास संशयिताने नाईक यांच्या घरी येऊन वाद घातला. यानंतर मंगल आणि प्रज्वल नाईक यांना लक्ष करून त्यांच्यावर लोखंडी रॉड, चाकू आणि कोयत्याने वार करून दोघांनाही जागीच गतप्राण केले. या घटनेनंतर संशयिताने पळ काढला. यादरम्यान काही नागरिकांना रक्ताने माखलेला कोयता नाईक यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापडल्याने परिसरातील नागरिकांनी नाईक यांच्या घराकडे धाव घेतली असता नेमका प्रकार दिसून आला. यानंतर याची माहिची ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार घटनास्थळी पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शिवाय तातडीने संशयित आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली. मध्यरात्री संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास चालविला आहे.
पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर गुरुवारी (दि.5) सकाळी दोन्ही मृतदेहाचे सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान दोन्ही खून नेमक्या कोणत्या कारणातून झाले याचा शोध पोलिस घेत आहेत. घटनेचा पुढील तपास सीपीआय बी.एस.तळवार यांनी चालवला आहे.
खून झालेल्या मयत कुटुंबीयांचा शेती व्यवसाय होता. मयत मंगल नाईक यांना प्रज्वल मुलगा तर प्राजक्ता ही मुलगी आहे. यापूर्वी मंगल नाईक यांच्या पतीचे निधन झाले होते. आता खून प्रकरणात मंगलसह प्रज्वल याचा बळी गेल्याने लहान असलेल्या प्राजक्ता हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिने या घटनेची वार्ता समजताच तिने हंबरडा फोडला. घरातील मोठ्या लोकांच्या जाण्याने ती अनाथ बनली आहे.