

बंगळूर, मुंबई : अजित पवार अपघाती मृत्यूप्रकरणी महाराष्ट्रात कुठेच एफआयआर नोंद होऊ न शकल्याने त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी अखेर बंगळूरमधील शेषाद्रीपुरम उपविभागीय पोलिस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा सहिंता 2023 च्या कलम 173 (1) अंतर्गत झीरो एफआयआर नोंदवला आहे.
एखाद्या गुन्ह्याबाबत देशभरात कुठेही एफआयआर नोंदवता येते या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. आ. पवार यांनी आपल्या तक्रारीत अपघातग्रस्त विमानाने दर पाच हजार तासांच्या उड्डाणानंतर जी दुरुस्ती-देखभाल गरजेची असते, ती मुदत केव्हाच ओलांडून सुमारे 8 हजार तास उड्डाण केल्याचा संशय व्यक्त केला असून महाराष्ट्राच्या डीजीपीकडे हा एफआयआर वर्ग करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये म्हणण्यात आले आहे की, 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.43 ते 8.45 च्या सुमारास व्हीएसआर व्हेंचर कंपनीच्या विमानातून अजित पवार मुंबईहून बारामतीला जात होते. त्यांच्यासोबत चार जण होते. सगळ्यांचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संपवण्याच्या उद्देशाने हा कट रचला गेला होता. त्यातूनच हा विमान अपघात घडला आहे. सध्या उपलब्ध झालेल्या पुराव्यावरून विमान चालकाने नियमांचे उल्लंघन केले आहे. नोंदीमध्ये हेतुपुरस्सर फेरफार केली असून विमानाच्या देखभाल व संचालनातील निष्काळजीपणा दिसून आला आहे.
24 फेबु्रवारी 2026 रोजी डीजीसीएने आपल्या सुरक्षा ऑडिट अहवालात कबूल केले की, व्हीएसआर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला आहे. उड्डाण करताना ते अयोग्य पद्धतीने केले गेले आहे. व्हीटी-एसएसके हे विमान जाणूनबुजून नियमांचे उल्लंघन करून चालविले जात होते. अपघात घडण्यापूर्वी विमानाने अंदाजे 4 हजार 915 तास उड्डाण केले होते. त्या प्रवासामुळेच इंजिनच्या टाईम बीफोर ओव्हरव्हॉल (टीबीओ) या 5 हजार तासांच्या मर्यादेपर्यंत पोहोचायला केवळ 85 तास शिल्लक होते. त्यामुळे धोकादायक पद्धतीनेच विमानाचा उड्डाणासाठी वापर करण्यात आला. असे असूनही गंभीर बाब म्हणजे व्हीएसआरने अधिकृत जी नोंद केली ती कमी वेळेची आहे. त्यामुळे विमानाने जवळपास 8 हजारपेक्षाही अधिक तास प्रवास केल्याचा संशय आहे.
नोंदीमध्ये फेरफार केल्यामुळे तसेच विमान सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हा अपघात घडल्याचे दिसते. डीसीजीसीएच्या प्रमाणपत्र नोंदणीमध्ये विसंगती आहे. विमान हवाई योग्यता प्रमाणपत्र 2021 मध्ये जारी करण्यात आले. तर विमान नोंदणी पत्र तब्बल 1 वर्षानंतर 27 डिसेंबर 2022 रोजी जारी करण्यात आले आहे.