

बेळगाव : अगरबत्ती व्यवसायाच्या निमित्ताने आर्थिक फसवणूक झालेल्या महिलांना आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. महिलांनी एकजुटीने या प्रकरणी पाठपुरावा करावा, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक तथा म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केलेमहिलांच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी पंढरपूरच्या भामट्याविरोधात बुधवारी (दि. 29) जुना पी. बी. रोड येथील साई भवन येथे महिलांची बैठक घेण्यात आली. यावेळी कोंडुसकर यांच्यासह शहापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सिमानी, सुनील बोकडे, किरण हुद्दार यांच्यासह इतर व्यासपीठावर होते.
बैठकीत पीडित महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि फसवणूक करणाऱ्या भामट्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. या बैठकीत शेकडेो महिलांनी सहभाग घेतला होता. या सर्व महिला शहापूर पोलिस ठाण्यात सामूहिक तक्रारी दाखल करणार आहेत. संबंधित भामट्याला तातडीने गजाआड करुन महिलांना न्याय मिळवून द्यावा, अशी तीव्र मागणी महिलांनी केली.
रमाकांत कोंडुसकर यांनी सर्व पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. श्रीराम सेना हिंदुस्तानच्या माध्यमातून या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक सिमानी यांनीही या प्रकरणी पोलिस गांभीर्याने तपास करत आहेत, असे सांगितले. पोलिसांकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.