बंगळूर : रात्रभर डासांची सोबत आणि ताटात बेचव अन्न अशा परिस्थितीत अभिनेते दर्शन आणि अभिनेत्री पवित्रा गौडा यांना कारागृहात राहावे लागत आहे. दोघेडी रात्रभर जागरण करत आहेत.
रेणुकास्वामी यांच्या हत्येप्रकरणी दोघेही परप्पन कारागृहात आहेत. एरव्ही शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी बिर्याणी, मटण, चिकन, फळे, ज्यूस यांचा आहार घेणाऱ्या अभिनेता दर्शन व अभिनेत्री पवित्रा गौडा यांना कारागृहातील बेचव व सपक अन्नाचे सेवन करावे लागत आहे. सध्या दर्शनाला कारागृहात सांबर आणि भात खाणे कठीण जात आहे. रात्रीच्या वेळी कारागृहाच्या मेन्यूनुसार रागी मुद्दे, भात, चपाती, भाजी, सांबर आणि ताक तुरुंगाच्या कर्मचाऱ्यांनी दिले. त्याने ते अन्न खाण्यास नकार दिला. दर्शनने नीट जेवण केले नाही. रात्रभर तो झोपला नाही. त्यामुळे तो अस्वस्थ असल्याचे दिसून आले. रात्री उशिरा झोपी गेलेल्या दर्शनला सकाळी ६ च्या सुमारास जाग आली. सकाळी त्याने कॉफी न पिता गरम पाणी मागितले. सोबतच्या कैद्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते त्याच्याशी तो फटकून वागला. तुमचा सहवास पुरे झाला, असे म्हणत कृपया मला एकट्याला सोडा असे म्हणत तो खोलीत एकटाच बसला.
दर्शनला परप्पन कारागृहातील एका खास बराकीत ठेवण्यात आले आहे, धनराज, विनय, प्रदुष हेदेखील त्या खोलीत आहेत. दर्शन आणि पवित्रा या दोघांनाही डासांनी चावल्याने ते रात्रभर जागेच होते. अस्वस्थ बनले होते. काल रविवार असल्याने कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांना भेटायला परवानगी नव्हती. पवित्रा गौडाला चपाती, भात, सांवार आणि ताक देण्यात आले. तिने नाईलाजाने ते जेवण घेतले. सोबतच्या कैद्यांबरोबर तिचे जमेनासे झाले आहेत. रात्री लवकर झोपूनही त्या वारंवार उठायचा, अशी माहिती मिळाली आहे.