

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
आगामी कित्तूर उत्सव व कित्तूर राणी चन्नम्मांचा 200 वा विजयोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या प्रचारासाठी सुसज्ज माध्यम केंद्राची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. कित्तूर येथील शेट्टर कल्याण मंडप येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, बुधवार दि. 23 पासून तीन दिवस होणार्या कित्तूर उत्सव कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी येणार्या माध्यम प्रतिनिधींची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. मीडिया सेंटर व मीडिया प्रतिनिधींशी समन्वय साधण्यासाठी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेश कुमार मीना हे प्रभारी अधिकारी असणार आहेत. मीडिया सेंटर व व्यासपीठाजवळील पत्रकारांच्या गॅलरीमध्ये कोणत्याही कारणास्तव जनतेला किंवा इतर कोणालाही परवानगी देण्यात येऊ नये.
त्याचबरोबर मीडिया सेंटरमध्ये सुसज्ज संगणक, हायस्पीड इंटरनेटचा वापर व मीडिया प्रतिनिधींना कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी चांगली आसनव्यवस्था करण्यात यावी. कार्यक्रमाच्या मुख्य मंचावर व माध्यम केंद्रावर माध्यमांचे प्रतिनिधी पोहोचण्यासाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था, कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी येणार्या पत्रकारांना पास वितरणासह सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस दिनेशकुमार मीना, बैलहोंगल उपविभागीय अधिकारी प्रभावती बाफकीलपूर, वार्ता आणि माहिती विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, तहसीलदार रवींद्र हादिमानी व पत्रकार उपस्थित होते.