

बेळगाव : बेळगावात सोमवारपासून सुरू झालेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजिलेल्या महामेळाव्याची प्रशासनाने धास्ती घेत नेत्यांची धरपकड केली. महामेळाव्यास्थळी जाणार्या रस्त्यांची नाकाबंदी करत मराठी भाषिक नेते आणि कार्यकर्ते अशा 74 जणांना अटक करण्यात आली. महामेळावा भरवण्यास परवानगी नाकारून मराठी भाषिकांचा लोकशाही हक्क डावलत राबवलेल्या अटकसत्राबद्दल बेळगावसह सीमाभागात संताप आहे. सामाजिक शांततेचा भंग, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सरकारविरोधी कृत्य असे गुन्हे त्यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आले आहेत. सायंकाळी त्यांची मुक्तता करण्यात आली.
सीमाप्रश्न 2004 मध्ये महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर 2006 पासून कर्नाटकाचे विधिमंडळ अधिवेशन बेळगावात भरवण्यास सुरुवात झाली. बेळगाववर हक्क सांगण्यासाठी कर्नाटकी प्रशासनाने आखलेल्या या क्लृप्तीला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीनेही त्या वर्षीपासून महामेळावा भरवणे सुरू केले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांना एकत्र करून विधिमंडळ अधिवेशनाला विरोध दर्शवला जातो. मात्र, यंदा जिल्हा प्रशासनाने महामेळाव्याला परवानगी नाकारत शहरात जमावबंदी लागू केली होती. तिचे उल्लंघन केल्याबद्दल समिती नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. म. ए. समितीने महामेळावा आयोजनासाठी शहरातील पाचपैकी एका ठिकाणी महामेळावा भरवू देण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र, पोलिस आयुक्तांनी महामेळाव्यालाच परवानगी नाकारून शहरात पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश दिला होता. त्याठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीसुद्धा धर्मवीर संभाजी चौकात महामेळावा भरविण्याचा निर्धार म. ए. समितीने केला होता. त्यामुळे, सकाळी सहापासूनच चौकात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी चौकाला भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली होती. तर उपायुक्त रोहन जगदीश व अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी शेवटपर्यंत तळ ठोकून होते.
समिती नेते व कार्यकर्ते गनिमीकाव्याने सभास्थळी येतील याची धास्ती असल्याने खबरदारी घेण्यात आली होती. काही समिती नेत्यांच्या घरासमोरच पोलिस तैनात करण्यात आले होते. महामेळाव्यासाठी घराबाहेर पडतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आले. अनेकांची वाटेतच धरपकड करण्यात आली. तरीसुद्धा नेते व कार्यकर्ते चौकात येतच होते. त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन पोलिस वाहनातून नेले जात होते. सकाळी आठपासून दुपारी साडेबारापर्यंत हा प्रकार सुरू होता. कार्यकर्ते सीमाप्रश्नाच्या घोषणा देत सभास्थळी जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, पोलिस त्यांना वाटेतच अडवून ताब्यात घेऊन वाहनांत कोंबत होते. ताब्यात घेतलेल्यांना आधी एपीएमसी व नंतर मारिहाळ पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथे दिवसभर स्थानबद्ध करून सायंकाळी उशिरा सोडून देण्यात आले. मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे व सहकार्यांना जत्तीमठाच्या कोपर्यावरच ताब्यात घेण्यात आले. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, आर. एम. चौगुले, खानापूर समितीचे गोपाळ पाटील, अनिल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आदींना रंगुबाई पॅलेसजवळ ताब्यात घेतले गेले. युवा समिती नेते शुभम शेळके यांना घराबाहेरच ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी नेण्यात आले. माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, खानापूर म. ए. समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत, आबासाहेब देसाई, माजी ता. पं. सदस्या कमल मन्नोळकर, मदन बामणे, अॅड. अमर येळ्ळूरकर, आर. के. पाटील, श्रीकांत मांडेकर, शिवानी पाटील, श्रीकांत कदम, प्रकाश चव्हाण, माजी जि. पं. सदस्य रमेश करेण्णावर, राजू पावले, भाऊ गडकरी, निरंजन सरदेसाई आदींसह अनेक कार्यकर्त्यांची संभाजी चौकात धरपकड करण्यात आली.
बेळगाव : महामेळावा घेण्यास मराठी जनतेला विरोध करत पोलिसांनी सोमवारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तेथून त्यांना मारिहाळ पोलिस ठाण्यात दिवसभर नजरकैदेत ठेवले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी केली. अन पोलिस ठाण्याच्या आवारात मराठी भाषिकांचा जणू मेळावाच भरला.
महामेळाव्याला विरोध करत धर्मवीर संभाजी चौकातून म. ए. समितीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना एपीएमसी पोलिस स्थानकात नेण्यात आले. तेथून मारिहाळ पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दिवसभर त्याठिकाणी त्यांना पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवले. सायंकाळी 5.30 वाजता कार्यकर्त्यांना सोडण्यात आले.
पोलिस ठाण्यात दिवसभर एकत्र राहिलेल्या कार्यकर्त्यांनी दिवसभर जोरदार घोषणाबाजी केली. संयुक्त महाराष्ट्राच्या जयघोषाबरोबरच नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात उत्साह भरुन राहिला होता. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. पोलिस ठाण्यात कार्यकर्त्यांची जेवणाची सोय करण्याची तयारी पोलिसांनी केली होती. परंतु कार्यकर्त्यांनी त्याला नकार दिला. रमाकांत कोंडुसकर यांनी व इतर काही कार्यकर्त्यांनी जेवणाची सोय केली होती. त्याचबरोबर खुर्च्यांंचीही सोय केली होती.
म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन मारिहाळ पोलिस स्थानकात नेण्यात आल्याची माहिती मराठी भाषिकांना समजताच अनेक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. त्याचबरोबर अॅड. महेश बिर्जे यांनी सहकार्यांसमवेत भेट देऊन माहिती घेतली.
म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांना धर्मवीर संभाजी महाराज चौकातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर एपीएमसी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. परंतु, तेथील पोलिसांनी मराठी भाषिकांना ताब्यात घेण्यास नकार दिला. यातून पोलिस वरिष्ठ अधिकार्यांमध्ये बाचाबाची झाली. मराठी भाषिकांसमोरच दोन अधिकार्यांमध्ये जुंपली. एपीएमसी पोलिस ठाण्यात आंदोलकांना ठेवण्यासाठी पुरेशी सोय नाही, असा युक्तिवाद एका अधिकार्यांकडून करण्यात आला. याठिकाणी जागा अपुरी असून त्यांना अन्य पोलिस ठाण्यात न्यावे, असे सुचविण्यात आले. त्यानंतर मराठी भाषिकांना पोलिस वाहनांतून मारिहाळ पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी कार्यकर्त्यांची सोय करण्यात आली; परंतु मराठी भाषिकांसमोरच पोलिस अधिकार्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीच्या प्रकाराची दिवसभर चर्चा रंगली होती.
आंदोलन ऐन भरात असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा ताफा धर्मवीर संभाजी चौकातून वीरसौधच्या दिशेने गेला. त्यांच्यासोबत पालकमंत्री सतीश जारकिहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी होते. परंतु, त्यांनी तिथे थांबून चौकशी करण्याचे स्वारस्य दाखविले नाही.
पोलिस प्रशासनाने दडपशाहीचा मार्ग अवलंबिला होता. त्यामुळे, धर्मवीर संभाजी चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दुपारपर्यंत तणावपूर्ण वातावरण होते. पोलिसांच्या उपस्थितीमुळे सर्वसामान्य लोकांमध्येही दहशत निर्माण झाली होती. पोलिसांमुळे रहदारीलाही अडथळा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.