बेळगाव : विदेशी प्रवाशांवर काटेकोर नजर: मुख्यमंत्री बसवराज बोम्मई | पुढारी

बेळगाव : विदेशी प्रवाशांवर काटेकोर नजर: मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचा नवा व्हायरस ओमायक्रॉनचा शिरकाव होऊ नये म्हणून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. हा विषाणू धोकादायक नसला तरी याच्या संसर्गाचा वेग अधिक आहे. त्यामुळे विदेशातून कर्नाटकात येणार्‍यांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. आवश्यकतेनुसार त्यांना क्वॉरंटाईन केले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

कोरोना सल्लागार समिती व मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कर्नाटकात अजूनही 45 लाख लोकांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतलेला नाही. सर्वांनी तातडीने डोस घ्यावा. यापुढे लसीकरण तीव्र गतीने करावे लागणार आहे. एकाच ठिकाणावर अधिक लोक राहणार्‍या लोकांवर नजर ठेवण्यात येत आहे.

सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. नव्या विषाणूचे रुग्ण सापडलेले नाहीत. राज्यात लॉकडाऊन जारी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. कुणीही अफवा पसरवू नयेत. खोट्या वृत्तावर विश्वास ठेवू नये.

कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. यावर नियंत्रणाचे काम केवळ सरकारचे नाही. सर्वांनी नियमांचे पालन केल्यास संसर्गावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे. बाजार, मॉल, बस स्थानक आदी ठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. संघ-संस्थांनी जनतेत जागृती करण्याचे आवाहन मुख्यमंत्री बोम्मई यांनी केले.

शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदीचा कोणताही निर्णय सध्या घेतलेला नाही. ख्रिसमस, नवे वर्ष साजरे करणे, बेळगावातील विधिमंडळ अधिवेशनाबाबत आरोग्य संघटनेच्या अहवालानंतरच ठरवले जाईल. मंगळवारी सकाळी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 18 देशांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग आढळला आहे. त्यामुळे बंगळूर आणि मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर, बंदरांवर तसेच सीमांवर काटेकोर तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्य संघटनेच्या अहवालाची प्रतीक्षा

दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून अहवाल सादर झाल्यानंतर कर्नाटकात नवी मार्गसूची जारी केली जाईल, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले. येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम याविषयी जागतिक आरोग्य संघटना एक-दोन दिवसांत अहवाल सादर करणार आहे. यावर चर्चा करुन पुढील उपाययोजना करण्यात येणार आहे.

Back to top button