बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : धामणे परिसरात धुमाकूळ घातलेल्या टस्करने परिसरातील शेतकर्यांची पीकहानी केली आहे. ऊस, भात, रताळी पिकांचे नुकसान केले असून, यापासून बचाव करण्यासाठी धामणेवासीयांकडून गजराजाचा आर्त धावा करण्यात येत आहे. परत जा रे देवा, अशी हाक देण्यात आली आहे.
टस्करने धामणे गावातील कुरमाणी शेतात धुमाकूळ घातला आहे. उभ्या उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्याचबरोबर भात पिकाचेही नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी हबकले आहेत. हातातोंडाला आलेल्या पिकांतून टस्करने धुमाकूळ घातल्याने शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. गावच्या परिसरातच टस्करचा वावर आहे. ग्रामस्थ धास्तावले असून त्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
गावातील 11 हून अधिकार्यांचे टस्करने नुकसान केले आहे. शनिवारपासून टस्करचा वावर आढळला असून गावच्या वेशीत आला होता. तो पुन्हा गावात येण्याची भीती ग्रामस्थांना भेडसावत आहे. आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने टस्करला नैसर्गिक आसरा मिळाला आहे.
धामणे गाव दुर्गम भागात वसले आहे. बेळगावपासून सुमारे 45 किमी अंतरावर असून महाराष्ट्राच्या हद्दीने चारी बाजूने वेढले आहे. परिणामी गावात कोणत्याही सोयीसवलती मिळालेल्या नाहीत. सर्व भाग जंगलाने व्यापल्याने वन्य प्राण्यांचा वावर नित्याचीच बाब झाली आहे.
टस्करने अनेक शेतकर्यांचे नुकसान केले आहे. वन विभागाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न चालविले आहेत. परंतु, काही शेतकर्यांच्या जमिनी वनखात्याच्या मालकीच्या आहेत. त्यांच्याकडे उतारे नाहीत. त्यांना अडचण निर्माण झाली आहे.
ऐन सुगीच्या हंगामात अवकाळी पावसाने परिसरातील शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. सुगीतच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे. त्यातच टस्करने पिकांचे नुकसान करून शेतकर्यांच्या अडचणीत भर घातली आहे. परिणामी शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे.
टस्करचा व्हिडीओ परिसरात व्हायरल झाला आहे. यामध्ये टस्कर टॅ्रक्टर ट्रॉली, दुचाकीचे नुकसान करताना दिसत आहे. यावेळी ग्रामस्थ 'परत जा रे देवा' अशी आर्त हाक देत असताना दिसून येत आहेत.
टस्करने शेतकर्यांचे नुकसान केले आहे. सरकारकडून योग्य भरपाई मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वन्य प्राण्यांपासून ग्रामस्थांना कायमस्वरुपी दिलासा देण्यासाठी उपाययोजना आखावी.
– परशराम कांबळे, ग्रामस्थ
टस्करने नुकसान केले आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांनी टस्करला बिथरवण्याचा प्रयत्न करू नये. मोबाईलमध्ये चित्रीकरण अथवा सेल्फी घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. सावध राहण्याची गरज आहे.
– रमेश गिरीयप्पण्णावर, वनाधिकारी, धामणे रेंज