निपाणी : कोडणीत उसाच्या शेतात गांजाचे आंतरपीक; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांची कारवाई | पुढारी

निपाणी : कोडणीत उसाच्या शेतात गांजाचे आंतरपीक; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांची कारवाई

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : कोडणी (ता.निपाणी) येथील शेतकऱ्याने चक्क ऊसामध्ये गांजाचे आंतरपीक घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. निपाणी पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी धाड टाकून या शेतकऱ्याला अटक केली. सदाशिव धोंडीराम खवरे (वय ५५) असे अटक केलेल्या संशयित शेतकऱ्याचे नाव असून त्याच्याकडून सुमारे ३ लाख रुपये किंमतीचा ९ किलो गांजा जप्त केला. विशेष म्हणजे खवरे यांनी उसामध्ये गाजांचे आंतरपीक घेतल्याचे समजल्यानंतर परिसरातील शेतकरी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, संशयित सदाशिव खवरे हे व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांनी आपल्या शेतीमध्ये गांजा पिकाचे आंतरपीक घेतल्याची माहिती खास खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार सीपीआय बी.एस. ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी, हवालदार प्रभू सिद्धाठगीमठ, शेखर असोदे, आर.एस.पाटील, रघु मेलगडे एम.डी.खोत यांनी सापळा रचुन संबंधित गांजा पिकाची उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला रंगेहाथ पकडले. यावेळी पोलिसांनी पालिका आयुक्त जगदीश हुलगेजी, दैहीक शिक्षण अधिकारी शांताराम जोगळे, निपाणीचे तलाठी आनंद मडिवाळ यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा केला.

यावेळी तपास पथकाने खवरे यांच्या ऊस पिकाची पाहणी करून ९ किलो गांजा जप्त करून खवरे यांच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला निपाणी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याची हिंडलगा जेलमध्ये रवानगी केल्याची माहिती सीपीआय बी. एस.तळवार यांनी दिली.

गांजाची रोपे पुरवठादार कोण?

संशयीत सदाशिव खवरे यांना उसामध्ये आंतरपीक म्हणून गांजाचे उत्पादक घेण्यासाठी प्रोत्साहन करण्याबरोबरच रोपे पुरवणारा कोण,ही रोपे कोठून आणली.याचा तपास पोलिसांनी गुप्तरित्या चालवला आहे. त्यामुळे आता तपास पथकाच्या रडारवर अटक करण्यात आलेल्या सदाशिव खवरे यांच्या पाठोपाठ रोपे पुरवणारा आहे. विशेष म्हणजे निपाणी पोलिसांनी यापूर्वी गांजा पुरवठा करणाऱ्या अनेकांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.सातत्याने सीमा भागाचा फायदा घेऊन गांजाची आयात निर्यात होते हे लक्षात आल्याने तपास पथकाने त्या अनुषंगाने या प्रकरणाच्या तपासला गती दिली आहे.

Back to top button