बेळगाव : हद्दीच्या वादात हत्तीचा फुटबॉल; हत्‍ती आक्रमक, घरांवर करतोय हल्‍ले | पुढारी

बेळगाव : हद्दीच्या वादात हत्तीचा फुटबॉल; हत्‍ती आक्रमक, घरांवर करतोय हल्‍ले

बेळगाव : संदीप तारिहाळकर आजरा येथील चाळोबा जंगलातून आलेला चाळोबा गणेश हत्ती बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेवर गत पंधरा दिवस ठाण मांडून आहे. तो आता आक्रमक होत असून, घरांवर हल्ले करत आहे. सदर हत्ती बेळगाव तालुक्यात आला की बेळगावचे वनअधिकारी महाराष्ट्र हद्दीत हुसकावून लावतात, तर महाराष्ट्र वनखात्याकडून जंगलाबाहेर आलेला हत्ती पुन्हा जंगलात हुसकाऊन लावला जात आहे. मात्र हा प्रकार पाहता हद्दीच्या वादात त्या हत्तीचाच फुटबॉल झाल्याचे स्पष्ट होत आहे. सुरुवातीला शांत असणारा हा हत्ती आता नुकसान करत आहे.

दिवसा व रात्री शिवारातील तसेच गावाशेजारील वाहने उलटून टाकण्याचे प्रकार या हत्‍तीकडून होत आहे. कोल्हापूर वनवृत्तमध्ये कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि रत्नागिरी हे पाच जिल्हे आहेत. यापैकी कोल्हापूर, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये सात हत्तींचा वावर आहे. सदर हत्ती दांडेली जंगल परिसरातून वीस वर्षांपूर्वीच आले आहेत. आलेल्या हत्तींना जुळवून घ्या असे सांगत महाराष्ट्र शासन जागृती करत आहे. मात्र सध्या या हत्तीपैकीच एक हत्ती सीमेवर धुमाकुळ घालत आहे. तो आता बेळगाव तालुक्यातील गावातील घरांवर हल्ले करत आहे. काही दिवसांपूर्वी सदर हत्तीने बेळगाव शहरापर्यंत मझल मारली. बेळगावच्या वनाधिकार्‍यांनी या हत्तीला चंदगड तालुक्यातील महिपाळगड जंगलात हुसकावून लावले. मात्र हा हत्ती गत पंधरा दिवस बेळगाव तालुक्यातील बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते या गावासह होसूर, कौलगे या गावात रोज रात्री दहशत निर्माण करुन पिकांचे नुकसान करत आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे.

कर्नाटकासह महाराष्ट्र अधिकार्‍यांची संयुक्त बैठक हवी

कर्नाटक तसेच महाराष्ट्राच्या वरिष्ठ वनअधिकार्‍यांनी याबाबत संयुक्त बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. सदर हत्ती दिवसा महिपाळगड जंगलाचा आधार तर रात्री गडाशेजारील कौलगे तलाव, किटवाड धरण येथील पाण्याचा वापर तसेच अन्न म्हणून परिसरातील ऊस, मका, काजू मुरटे आदी खात आहे. रोज या हत्तीला सुमारे दीडशे ते 200 किलो गवत व 200 लिटर पाण्याची गरज आहे. मात्र हे अन्न जर पुढील काळात न मिळाल्यास हत्ती आणखी रौद्ररुप धारण करु शकतो, अशी शक्यता आहे. याच हत्तीने बेकिनकेरे शिवारात दोन ट्रॉल्या व अतिवाड फाटा शिवारात एका रोटरचे नुकसान केले आहे. विविध पाणी योजनांच्या पाईपचे, पिकांचे नुकसान सुरूच आहे. बेळगाव जवळ आलेला हत्ती हुसकावून लावण्यापलीकडे बेळगाव वनखात्याकडून विशेष प्रयत्न होत नाहीत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. लोकांचे बळी गेल्यावरच शासन जागे होणार का, असा संतप्त सवाल व्यक्त करत आहेत.

कोल्हापूर, सिंधुदुर्ग क्षेत्रात 7 हत्ती

दांडेली जंगलातून आलेले हत्ती आता दोडामार्ग (सिंधुदुर्ग), तिलारी (चंदगड) वनक्षेत्रात संचार करत आहेत. यापैकी दोन नर, एक मादी, तीन पिले असा कळप आहे. तर चाळोबा गणेश हा सीमाभागात आहे. महाराष्ट्र शासनाने दोन वर्षापासून हत्ती तज्ज्ञ म्हणून आनंद शिंदे यांची नियुक्ती केली असून ते हत्ती संचार करणार्‍या गावांमधून फिरुन हत्तीला जुळवून घ्या, हत्तीला पुरेसे अनुकूल वातावरण निर्मिती करा, या हेतूने जनजागृती करत आहेत. मात्र सीमाभागातील हत्ती लोकांच्या घराजवळ येऊन हल्ला करत आहे. त्यामुळे हा प्रश्न आता नव्याने गंभीर बनला आहे.

महाराष्ट्राच्या 23 कर्मचार्‍यांच्या पथकाकडून नियंत्रण

महाराष्ट्र वन खात्याकडून सदर हत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1 वनपाल, 2 वनरक्षक, हत्ती हाकारा गटाचे 20 कर्मचारी रोज गस्त ठेवून नियंत्रण ठेवत आहेत. तसेच शासन पुरस्कृत हत्तीतज्ञ आनंद शिंदे हे हत्ती संचार भागातील गावात जनजागृती करत आहेत.
कोल्हापूर वनवृत्तात हत्तीचा अढळ 20 वर्षापूर्वी नव्हता. मात्र दांडेली जंगलातून तिलारीत हत्तीनी प्रवेश केला. यापैकीच एका हत्तीने आजरा येथील जंगलात प्रवेश केला. यानंतर तो चंदगड-बेळगाव सीमेवर आला आहे. सर्वती खबरदारी घेत आहोत. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सदर हत्ती आल्या मार्गाने आजरा जंगलात जावा यासाठी प्रयत्न करत आहोत.

– प्रशांत आवळे
वनपरिक्षेत्र अधिकारी, पाटणे विभाग चंदगड

बेळगाव-चंदगड तालुक्याच्या सीमेवर बेळगाव वनखात्याकडून 24 तास दोन पथके तैनात आहेत. हत्तीने नुकसान केलेली एकही तक्रार आपल्याकडे आलेली नाही. स्थानिकांच्या जीवितास धोका पोहचू नये म्हणून आम्ही प्रयत्नशिल आहे. या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांचे मार्गदर्शन घेत आहे.
– एस. के. कोलोळीकर,
उपवनसंरक्षण अधिकारी, बेळगाव.

Back to top button