

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठ दिवसांपासून कोरड्या पडलेल्या वेदगंगा नदीमध्ये काळम्मावाडी धरणातून शनिवारी (दि. २) पाणी सोडण्यात आले आहे. खबरदारी म्हणून गुरुवारपर्यंत काठावर शेतीसाठी उपसाबंदी लागू केली आहे. केवळ पिण्यासाठी पाण्याचा वापर व्हावा यासाठी हेस्कॉमने संबंधित पाणीपुरवठा योजनेसाठीचा वीज पुरवठा कायमपणे सुरळीत ठेवला आहे अशी माहिती अथणी लघुपाटबंधारे विभागाचे अभियंते बी.एस.लमानी यांनी दै.पुढारीशी बोलताना दिली.
गेल्या आठ दिवसापासून वेदगंगा नदी कोरडी पडल्याने निपाणी शहरात अभुतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत महिन्यातून केवळ तीन वेळा (दहा दिवसातून) एक दिवस पाणीपुरवठा होत आहे.वेदगंगेत पाणी नसल्याने उपसा थांबला आहे.त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.दरम्यान आ.शशिकला जोल्ले यांनी दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील पाटबंधारे विभागाशी प्रत्यक्ष संपर्क साधून पाणी सोडण्याची विनंती केली होती.
त्यानुसार काळम्मावाडी धरण प्रशासनाने चिखली बंधाऱ्यातून दोन दरवाजातून पाणी कर्नाटक सीमाभागातील शनिवारी सोडले आहे. हे पाणी रविवारी संध्याकाळपर्यंत बुदिहाळ बंधारा पास करून पुढे सरकत आहे.हे पाणी पूर्ण क्षमतेने सिदनाळ धरणापर्यंत गुरुवारपर्यंत जाऊन थांबणार आहे. यासाठी केवळ शहरासह ग्रामीण भागात ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पिण्याच्या पाणी योजनेसाठीचा वीजपुरवठा सुरळीत ठेवून शेती उपसासाठीच्या विद्युत पंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यानुसार हेस्कॉमने ही कार्यवाही केली आहे.
सद्यस्थितीत नोव्हेंबरपासून शनिवार अखेर चौथ्या टप्प्यातील पाणी कर्नाटकच्या हिस्याचे पाणी काळम्मावाडी धरण प्रशासनाने अखेरपर्यंत पाणी सोडले आहे. यापुढे मे अखेर तीन टप्प्यात दर महिन्याला पाणी सोडण्यात येणार आहे.तरी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन पाटबंधारे खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत शनिवारी सायंकाळपासुन उपसाबंदी लागू केली आहे.पहिल्या टप्प्यात नदी काठावरील निम्म्या गावांचा तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित गावांचा शेतीसाठीच्या विद्युतपंपांचा वीज पुरवठा खंडित केल्या जाणार आहे.गुरुवारपर्यंत उपसाबंदीचे आदेश पाटबंधारे खात्याने दिले आहेत.त्यानुसार ही उपसाबंदी लागू केली आहे.