

बंगळूर : शेअर बाजारात ऑनलाईन गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 7 कोेटींची फसवणूक करणार्या टोळीचा बंगळूर नैऋत्य विभाग पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून 6 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
डीसीपी अनिता हद्दण्णावर म्हणाल्या, या प्रकरणातील संशयितांंकडून 19 लॅपटॉप, 40 मोबाईल फोन, 11 पेन ड्राईव्ह, 42 सिम कार्ड, 4 आयपॅड, 2 हार्ड डिस्क, 5 सीपीयू, 10 मेमरी कार्ड, परदेशी चलन, चलन मोजणी यंत्रे, 6 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आणि 50 हून अधिक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
सर्व संशयित सोशल मीडियाद्वारे गुंतवणुकीचा प्रचार करत आहेत. संशयित उच्च परताव्याचे आश्वासन देऊन देश-विदेशातील जनतेकडून पैसे वसूल करत होते. केंगेरी पोलिसांचा समावेश असलेल्या विशेष पथकांनी सात ठिकाणी छापे टाकून 8 संशयितांना अटक केली. फसवणूक झालेल्या नागरिकांनी केंगेरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.