निपाणीसह सोलापूरमधील दोन चोरट्यांना अटक, महाराष्ट्र पोलिसांची कारवाई | पुढारी

निपाणीसह सोलापूरमधील दोन चोरट्यांना अटक, महाराष्ट्र पोलिसांची कारवाई

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : हुक्केरी व गडहिंग्लज तालुक्याच्या सीमेवरील इदरगुची (ता. गडहिंग्लज) येथील एका घरफोडी प्रकरणातील दोन चोरांना गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक निपाणी आणि एक सोलापूरमधील आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघा आरोपींकडून एक लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गडहिंग्लज पोलीस उपाधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई केली. निपाणी शहरातील दस्तगीर कादरसाब मलोडी ( वय 48, रा. संभाजीनगर, तिसरी गल्ली, निपाणी) व त्याचा मित्र राजासाब गुलाब नाईकवाडी (वय 43, रा. सोलापूर, ता. हुक्केरी) हे दोघेजण करमाळा (जि. सोलापूर) येथे एका दर्गामध्ये देवदर्शनासाठी गेल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून करमाळा येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख रुपयांहून अधिक किमतीची सोन्याची चेन, एका मंदिरातील देवीचा चांदीचा मुखवटा तसेच अन्य काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांकडून सीमेवरील आणखी दोन चोऱ्यांची कबुली देण्यात आली आहे. या दोघांनी केलेल्या आणखी चोऱ्यांचा तपास देखील सुरू आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेले मलोडी आणि नाईकवाडी हे दोघेजण सीमेवरील काही गावांमधून चोऱ्या करायचे. सोलापूर येथे जाऊन दर्शनासाठी जाण्याचे निमित्त करून तेथे मुक्काम करायचे. गडहिंग्लज पोलिसांच्या विशेष पथकाचे प्रमुख एपीआय रोहित दिवसे, वैभव गवळी, राज सनदी, दीपक किल्लेदार, धनाजी पाटील, गणेश मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button