बेळगाव : निपाणी नगरपालिकेत नगरसेवक संजय सांगावकर, विनायक वडे यांचे आंदोलन | पुढारी

बेळगाव : निपाणी नगरपालिकेत नगरसेवक संजय सांगावकर, विनायक वडे यांचे आंदोलन

निपाणी ; राजेश शेडगे : निपाणी नगरपालिका कार्यालयावरील भगवा झेंडा जीर्ण झाल्याने तो बदलण्यात यावा अशी मागणी नगरसेवक संजय सांगावकर व विनायक वडे यांनी केली होती. आज (मंगळवार) 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज फडकवण्याआधी भगवा झेंडा बदलून लावावा अशी मागणी त्यांनी केली. परंतु पोलीस प्रशासनाने हा भगवा झेंडा बदलण्यास त्यांना मज्जाव केला. यामुळे सांगावकर व वडे यांनी पालिका सभागृहाबाहेर ठाण मांडले.

पालिका आयुक्त जगदीश हुलगेजी यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी व पालिकेचे प्रशासक नितेश पाटील यांची परवानगी घ्यावी असे सुचित केले. सीपीआय संगमेश शिवयोगी, पोलीस उपनिरीक्षक उमादेवी व पोलिसांनी त्‍यांना भगवा झेंडा बदलू दिला नाही. यावेळी त्यांना पालिकेच्या इमारतीवरून खाली नेण्यात आले. यानंतर सांगावकर व वडे यांनी पालिका सभागृहात काही काळ ठाण मांडले.
राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये अशी कोणतीही कृती करू नका अशी समज सीपीआय संगमेश्वर शिवयोगी यांनी त्यांना दिली. जीर्ण झालेल्या भगवा ध्वज तरी आहे तसा राहू द्या अशी त्यांनी मागणी केली. जीर्ण झालेला भगवा ध्वज पुन्हा पालिकेवर लावण्यात आला. यावेळी पालिकेत मोठा बंदोबस्त होता.

हेही वाचा :  

Back to top button