निवडणूक आयोगाकडून सुविधा; आता उमेदवारी अर्जही भरा ऑनलाईन | पुढारी

निवडणूक आयोगाकडून सुविधा; आता उमेदवारी अर्जही भरा ऑनलाईन

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  ज्या प्रकारे मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी, मतदार यादीत नाव घालण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. तशाच प्रकारे उमेदवारांना आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोग जरी टेक्नोसॅव्ही झाले तरी त्याला प्रतिसाद कसा मिळणार, हेसुद्धा पाहावे लागणार आहे.

13 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज करता येणार आहे. उमेदवारी अर्ज करण्यासाठी अनेकजण शक्तिप्रदर्शन करत असतात. अधिकाधिक समर्थकांना घेऊन, घोषणाबाजी करत उमेदवारी अर्ज भरण्यात येतो; पण अशी गर्दी टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकार्‍यांकडे अर्ज करण्यासाठी केवळ पाचजणांनाच परवाना देण्यात आला आहे; अन्यथा आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचा आणि प्रसंगी उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवण्याचा इशारा दिला. त्यामुळे मोठे मोठे उमेदवार रस्त्यात शक्तिप्रदर्शन करत असले तरी निवडणूक अधिकार्‍यांकडे मात्र वाकूनच जातात, नियमाप्रमाणे मोजके लोक घेऊन जातात. आता उमेदवारांना हेही कष्ट उचलावे लागू नये, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने ही सुविधा उपलब्ध करून देताना संकेतस्थळाचे नावही सुविधा असेच ठेवले आहे, हे विशेष. काही दिवसांपूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुका आणि त्याआधी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या काळातही उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली होती. त्यामुळे उमेदवारांना अगदी घरात बसून ऑनलाईन अर्ज भरणा करता येऊ शकतो.

अर्जाशिवाय याही परवानग्या

ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून, याचबरोबर suvidha.eci.gov.in या वेबसाईटवर मतदार नोंदणी, मतदान ओळखपत्र काढून घेणे, प्रचारासाठी विविध परवानग्याही देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीला तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला आहे.

असा करा अर्ज

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, suvidha.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन करता येणार आहे. या संकेतस्थळावर आपला मोबाईल क्रमांक टाकला की वेबपेज ओपन होते. अर्ज भरणा यावर क्लिक केले की, अर्जाची सर्व पाने ओपन होतात. आवश्यक माहिती त्यामध्ये नोंद केल्यानंतर लोडवर क्लिक केले की अर्ज भरणा होते. त्याची प्रिंट काढून घेऊन अर्ज भरणा करण्याच्या शेवटच्या तारखेआधी संबंधित निवडणूक अधिकार्‍यांकडे देणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन अर्ज करताना ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कम जमा करता येऊ शकते.

Back to top button