बेळगाव : दूषित पाण्यामुळे मार्कंडेयमधील माशांचा मृत्यू

कंग्राळी : पुढारी वृत्तसेवा : मार्कंडेय नदीतील पाणी दूषित बनल्याने हजारो मासे मृत झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडल्याचे दिसून आले. याठिकाणी मृत मासे पकडण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. मासे अचानक मृत झाल्याने गावकरी धास्तावले असून, यापासून जनावरांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मार्कंडेयमध्ये थेट सांडपाणी सोडण्यात येत असल्याने फटका बसल्याची शक्यता गावकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.
मार्कंडेय नदीवर अलतगा फाट्यावर बंधारा आहे. याठिकाणी पाणी अडवण्यात आले असून, सध्या पाणी दूषित बनले आहे. पुलाजवळ नदीत दूषित पाण्यामुळे मृत माशांचा खच पडल्याचे सकाळी दिसून आले. याची माहिती ग्रामपंचायतीला देण्यात आली. त्यानंतर ग्रा. पं. अध्यक्ष, सदस्यांनी धाव घेऊन पाहणी केली. याठिकाणी काहीजण मृत मासे पकडण्यासाठी धडपडत होते. त्यांना समज देण्यात आली.
मार्कंडेय नदीमध्ये बेळगाव परिसरातील सांडपाणी थेट सोडण्यात येते. शिवारातील ओढ्यातून ते मार्कंडेयमध्ये येते. यातून नदीतील पाणी दूषित बनले आहे. यातून हजारो मासे मृत झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
ग्रा.पं. अध्यक्ष यल्लापा पाटील, सदस्य प्रशांत पाटील, राकेश पाटील, वैजू बेन्नाळकर, चेतक कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीने फळ्या काढल्या. त्यानंतर नदीमध्ये हजारो मासे मृत पावल्याचे दिसून आले.
प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष
नदीतील याच पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो. जनावरांनाही वापर केला जातो. नदीच्या काठावर गावाला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीसुद्धा आहेत. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात येत आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे गावकऱ्यांसह जनावरांचाही जीव धोक्यात सापडला आहे.