निपाणी : चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ५४ प्रवाशांचे प्राण | पुढारी

निपाणी : चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ५४ प्रवाशांचे प्राण

निपाणी : पुढारी वृत्तसेवा : येथील बस आगारातील बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील ५४ प्रवाशांचे प्राण वाचले. गजाप्पा मुदकवी असे त्या चालकाचे नाव असून बेळगाव बसस्थानकावर प्रवाशांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मुदकवी हे मूळचे इनाहुलकेरी (ता. बदामी, जि. बागलकोट) येथील रहिवासी असून गेल्या आठ वर्षांपासून येथील बस आगारात चालक म्हणून सेवेत आहेत. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ते कोल्हापूर येथून बेळगावला बस घेऊन जात होते. बस कणगला हद्दीतील हिटणी फाटा येथे आली असता रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कंटेनर चालकाने आपले वाहन अचानक मुख्य रस्त्यावर आडवे मारले. ही घटना लक्षात येताच मुदकवी यांनी बस वळण असलेल्या जागेवरून सर्व्हिस रस्त्यावर घेतली. त्यामुळे मोठा अपघात टळला. या बसमध्ये ५४ प्रवासी होते. या ठिकाणी वळण नसते तर बस कंटेनरवर आदळून प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता असता.

मुदकवी यांनी प्रसंगावधान राखत ५४ प्रवाशांच्यावर आलेले संकट टाळल्याने बेळगाव येथील बसस्थानकात प्रवासी गोविंद पारीख यांच्यासह इतर प्रवाशांनी त्यांचा सत्कार केला. मुदकवी यांनी प्रसंगावधान राखत प्रवाशांचा जीव वाचवल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी वर्गातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

मुदकवी यांनी प्रसंगावधान राखत ५४ प्रवाशांचे प्राण वाचविल्याबद्दल त्यांच्या कार्याचा व दाखवलेल्या धाडसाचा अभिमान वाटत आहे. मुदकवी याने आजपर्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली असून येथील आगार प्रशासनाच्या वतीने त्याचा गौरव केला जाणार आहे.
– एस. संगाप्पा ( आगार व्यवस्थापक, निपाणी )

Back to top button