बंगळूर : वीज कर्मचाऱ्यांना २० टक्के वेतन वाढ; आजपासूनचा संप मागे घेतला जाणार | पुढारी

बंगळूर : वीज कर्मचाऱ्यांना २० टक्के वेतन वाढ; आजपासूनचा संप मागे घेतला जाणार

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा ;  वेतनवाढीसाठी वीज वितरण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर सरकारने कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देत २० टक्के वेतन वाढीचा आदेश जारी केला आहे. तरीही उद्या गुरुवारपासून होणारे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत केली नव्हती. मात्र वेतनवाढीमुळे संप मागे घेतला जाण्याची शक्यता आहे.

कर्नाटक विद्युत प्रसारण मंडळ आणि सर्व वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना २० टक्के वेतन वाढ करण्याचा आदेश बजावला आहे. एप्रिलपासून वेतनवाढ करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना व्यवस्थापकी संचालकांना करण्यात आली आहे, असे ऊर्जा मंत्री व्ही. सुनीलकुमार यांनी सांगितले.

परिवहन कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्याला प्रतिसाद

परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनीही वेतन वाढीसाठी आंदोलनाचा इशारा सरकारला दिला होता. सरकारने त्यांच्या वेतनवाढीसाठीही पुढाकार घेतला आहे. परिवहन मंत्री बी. श्रीरामलू यांनी सांगितले की, कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर पहिल्या टप्प्यातील चर्चा झाली आहे.

सुधारित वेतनवाढ करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. २४ टक्के वेतनवाढ करण्याची मागणी परिवहन कर्मचाऱ्यांनी केली आहे. १२ टक्के वेतनवाढ करण्याची संमती दर्शविली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई अंतिम निर्णय घेतील.

Back to top button