आचारसंहितेपूर्वीच निपाणी मतदारसंघ निवडणूकमय

निपाणी : राजेश शेडगे कर्नाटक विधानसभेची निवडणूक तारीख व आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी निपाणी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण झाले आहे. बुधवारी भाजपने माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प यात्रा उत्साहात पार पाडली. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते चार्ज झाले आहेत. भाजपचे संघटना सचिव सी. टी. रवी यांनी मंत्री शशिकला जोल्ले या तिसऱ्या वेळी विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी केलेल्या विकासकामांची पोच मतदार देतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे भाजपच्या उमेदवार या शशिकला जोल्लेच असणार हे स्पष्ट झाले आहे.
माजी मंत्री आ. रमेश जारकीहोळी यांनी निपाणीमधून मंत्री जोल्ले यांना तिकीट देऊ नये यासाठी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन प्रयत्न केला होता. त्याला पूर्णविराम मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना कोणीही आडवे आले तरी एक घाव दोन तुकडे करा आणि विजय खेचून आणा असा सल्ला दिला आहे. त्यांचे हे सूचक वक्तव्य लक्षवेधी ठरले आहे.
त्यांची हॅट्रिक साधण्याचा निर्धार भाजपचे नेते व कार्यकर्त्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून जोल्ले ग्रुपने निपाणी मतदारसंघात विविध व कार्यक्रमांचे आयोजन करून निवडणूकमय वातावरण केले आहे. शिवपुत्र संभाजी या महानाट्यास सहा दिवसांत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तत्पूर्वी वीर राणी कित्तूर चन्नम्मा या कन्नड महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. पतंग महोत्सव, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा, ग्रामीण भागात जोल्ले प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे. याबरोबरच शहर व ग्रामीण भागात मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे नारळ फोडले जात आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी निपाणी शहरात डिजिटल फलक मोठ्या प्रमाणात झळकले आहेत.
काँग्रेसने मतदारसंघात प्रचार दौरा पूर्ण केला असून काकासाहेब पाटील हेच काँग्रेसचे उमेदवार असतील असे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी ठिकठिकाणी स्पष्ट केले आहे. अद्याप काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा झालेली नाही. काँग्रेसची प्रजाध्वनी यात्रा १५ मार्च रोजी होणार आहे. यात्रेमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या कॉंग्रेस उमेदवाराची घोषणा करतात का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
युवा नेते उत्तम पाटील यांनीदेखील मंतदार संघात हळदी- कुंकू, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रचार दौरा केला आहे. व्हॉलीबॉल स्पर्धा, अरिहंत चषक क्रिकेट स्पर्धा, ग्रामीण भागात शर्यती अशा विविध इव्हेंटचे आयोजन करून त्यांनी मतदारांना व युवकांना भुरळ घातली आहे. काँग्रेसचे तिकीट मिळावे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. माजी आमदार सुभाष जोशी व काही नगरसेवकांची त्यांना साथ मिळाली आहे. त्यामुळे निपाणी विधानसभेची निवडणूक तिरंगी होणार का, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सीमा समन्वय मंत्र्यांची नियुक्ती जाहीर केली आहे याचा परिणाम मराठी भाषिकांवर कसा होणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे. मंत्री शशिकला जोल्ले यांच्या तिसऱ्या विजयासाठी भाजपने कंबर कसली आहे. यंदा तरुण मतदारांची टक्केवारी वाढली आहे. हे मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार तेही निर्णायक ठरणार आहे.
काहीजण कुंपणावर बसले आहेत. निवडणूक जाहीर होताच उमेदवार ठरतात. आयाराम-गयारामांचे पक्षांतर होणार आहे. सध्या तरी भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार कोणकोणत्या क्लुप्त्या लढवतात, त्यावर निवडणूक रंगतदार ठरणार आहे. काकासाहेब पाटील हे काँग्रेसचे उमेदवार ठरले तर त्यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा निपाणीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील निपाणी दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात निपाणीचे राजकारण ढवळून निघणार आहे.
भाजप-काँग्रेसमध्येच खरी लढत
निवडणुकीत अनेक उमेदवार उतरणार असले तरी खरी लढत ही भाजपविरुद्ध काँग्रेस अशीच ठरणार आहे. काही राजकीय विश्लेषक जातींच्या आधारावर निवडणुकांच्या निकालाकडे पाहत आहेत. यावेळी लॉबीचे राजकारण कितपत यशस्वी ठरणार, याची चर्चा सुरू झाली आहे. एक मात्र खरे की गेल्या दहा वर्षांत मंत्री शशिकला जोल्ले यांनी निपाणी विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा ‘धडाका लावला आहे. त्यामुळे जातीच्या समीकरणावर ही निवडणूक होणार की विकासाच्या मुद्दयावर होणार हे निवडणूक रिंगणात दिसून येणार आहे. सध्या तरी काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाला नसल्याने वातावरण अस्पष्ट आहे. आचारसंहिता लागू होताच मतदारसंघातील राजकीय नाट्य गतिमान होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत पारंपरिक उमेदवार बाजी मारणार की अन्य कोणाची सरशी होणार, याविषयी चर्चांना ऊत आला आहे. जिल्ह्यातील मातब्बर नेते मंडळी राजकीय जुळवाजुळव कशी करणार, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.