बेळगाव : पैसे बँकेचे, पाठवले भावाला, वापरले स्वतः; सीएस बँकेत १४ लाखांचा गैरव्यवहार | पुढारी

बेळगाव : पैसे बँकेचे, पाठवले भावाला, वापरले स्वतः; सीएस बँकेत १४ लाखांचा गैरव्यवहार

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  बँकेत कॅशिअर म्हणून काऊंटरला बसल्यानंतर बँकेतील १४ लाख १५ हजार रुपये आधी भावाच्या नावावर पाठवले. तेथून ते स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेत वापरले. चार दिवसांनी बँकेला हा गैरव्यवहार माहिती झाल्यानंतर गुरुवारी याप्रकरणी खडेबाजार पोलिसांत संबंधित बँक अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

महंमद इलियास दस्तगीरसाब जकाती (वय ४१, रा. मिरज, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आपली चूक कबूल करून त्याने बँकेत १२ लाख ६० हजार रु. भरलेदेखील. परंतु, हा बँकेतील गैरव्यवहार असल्याने बँक व्यवस्थापक जगजीत मदन डोंगरे यांनी त्याच्याविरोधात खडेबाजार पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार त्याच्याविरोधात फसवणुकीसह विश्वासघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

खडेबाजार पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सीएसबी (कॅथॉलिक सिराईन बँक) ही केरळस्थित बँक असून, त्याच्या बेळगावातही शाखा आहेत. त्यांची एक शाखा स्टेशन रोड येथे आहे. महंमद इलियास हा या बँकेत गोल्डलोन ऑफिसर म्हणून काम करत होता. ४ मार्च रोजी कॅशिअर सुट्टीवर असल्याने त्याला कॅशिअरचे काम दिले होते. यावेळी त्याने बँकेत जमा झालेल्या रकमेपैकी १४ लाख १५ हजारांची रक्कम आधी आपल्या भावाच्या खात्यावर वर्ग केली. कारण, भावाचे खाते याच बँकेत असल्याने पाठवणे सोपे झाले. यानंतर ही रक्कम स्वतःच्या खात्यावर वर्ग करून त्याचा वापर स्वतःच्या आर्थिक व्यवहारासाठी केला.

चार दिवसांनी उघड

ज्या दिवशी महंमद इलियास हा कॅशिअर म्हणून बसला होता, त्या दिवशी बँकेच्या रकमेत १४ लाख १५ हजारांचा फरक आला. त्या दिवशी बँकेतील अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांनी नेमका कुठे घोळ झाला आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, काहीही सापडले नाही. कारण, महंमद इलियासदेखील काहीच बोलला नाही. गेल्या चार दिवसांपासूनचे सर्व व्यवहार तपासत असताना रक्कम कुठे ट्रान्स्फर झाली आहे, याची काळजीपूर्वक तपासणी केली. यावेळी १४ लाख १५ हजारांची रक्कम महंमद इलियास याच्या भावाच्या खात्यावर व तेथून पुन्हा महंमद इलियासच्या खात्यावर ट्रान्स्फर झाल्याचे आढळून आले.

अॅपला भुलला अन् नोकरीला मुकला

महंमद इलियास हा गोल्डलोन ऑफिसर; पण त्या दिवशी त्याला कॅशिअर म्हणून बसवले अन् त्याच्या मनात लोभ निर्माण झाला. इफ्लिक्स नावाचे एक अॅप असून, त्यावर एका दिवसात रक्कम दुप्पट अशी ऑफर असल्याचे त्याने पाहिले होते. रक्कम खरोखरच एका दिवसात डबल होणार, अशी आशा महंमदच्या मनातही जागी झाली. आपण एक दिवसासाठी या अॅपवर बँकेतील रक्कम गुंतवू, डबल झाली की बँकेची रक्कम बँकेला भरू व उर्वरित १४ लाख आपलेच. असा गैरसमज करून घेत त्याने ही रक्कम बँकेतून आपल्या खात्यावर घेतली. परंतु, ॲपवर घातलेली त्याची ही रक्कम दुप्पट तर दूरच; पण गुंतवलेलीदेखील बुडाली. एका अॅपच्या मागे लागून महंमद इलियासने पैसे गमावलेच; पण सध्या तरी नोकरीही गमावली आहे.

गैरव्यवहाराची कबुली

याबाबत बँक व्यवस्थापक डोंगरे यांनी त्याला विचारणा केली असता आपली चोरी पकडल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने सर्व ती कबुली दिली. आपणच हा गैरव्यवहार केला असून, माफ करा व मी रक्कम भरतो, अशी विनवणी त्याने केली. शिवाय त्याने १२ लाख ६० हजारांची रक्कम बँकेत तातडीने भरली. उर्वरित १ लाख ५५ हजारांची रक्कमही दोन दिवसांत भरण्याची कबुली त्याने दिली. परंतु, हा जनतेच्या पैशाचा अपहार असल्याने नियमानुसार बँक व्यवस्थापक मदन डोंगरे यांनी याबाबतची फिर्याद खडेबाजार पोलिसांत दिली. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक रत्नकुमार तपास करीत आहेत.

Back to top button