बेळगाव : भूल न देता काढला मेंदूतील ट्यूमर | पुढारी

बेळगाव : भूल न देता काढला मेंदूतील ट्यूमर

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयातील न्यूरोसर्जनच्या पथकाने ३३ वर्षीय महिलेच्या मेंदूतील ट्यूमर (गाठ) यशस्वीरीत्या काढली. महिला पूर्णपणे शुद्धीत असताना कोणतीही भूल न देता ही गाठ काढण्यात आली. शस्त्रक्रिया सुरू असताना तिच्याशी संवाद साधला जात होता. ती हात हलवत होती. शस्त्रक्रियेनंतर तिने २ तासांत अन्न खाणे आणि चालणे सुरू केले आणि ३ दिवसांनी घरी गेल्या.

अवेक कॅनियोटॉमी ही मेंदूत ट्यूमर असलेल्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया केली जाते. या प्रकरणात ट्यूमर अगदी हाताच्या मोटार कॉर्टेक्सवर होता. मेंदूचा भाग जो बोटांनी, मनगट आणि कोपराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो. त्यामुळे शल्यचिकित्सकांनी हाताच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला जागृत ठेवण्याचा पर्याय निवडला. केएलई रुग्णालयात प्रथमच जागृत मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली.

न्यूरोसर्जन डॉ. अभिषेक पाटील आणि डॉ. विक्रम टी. पी. यांनी या यशस्वी शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले. डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. पूर्वी देशमुख आणि डॉ. रवी केरूर यांच्या ऍनेस्थेसिया टीमचे मोठे योगदान आहे.

अवेक ब्रेन सर्जरी ही मेंदूच्या विविध विकारांसाठी एक नवी संकल्पना आहे. आणि ती पाश्चात्य देशांत नियमितपणे केली जाते. हाताच्या मोटार कॉर्टेक्सवर कमी दर्जाची गाठ असलेली ही महिला या शस्त्रक्रियेसाठी योग्य होती आणि आम्ही तिची शारीरिक, मानसिक कमतरता न वाढवता संपूर्ण ट्यूमर काढून टाकू शकतो, असे या शस्त्रक्रियेचे नेतृत्व करणारे डॉ. अभिषेक पाटील म्हणाले.

रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. (कर्नल) एम. दयानंद यांनी अत्यंत कौशल्याने आणि समर्पणाने ही शस्त्रक्रिया केल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

Back to top button