

बंगळूर : काही मंत्र्यांसह प्रभावी नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा विषय गुरुवारी (दि. 20) विधानसभेत गाजला. सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील सुमारे 48 नेत्यांना यामध्ये गोवण्यात येत असल्याबाबत दीर्घ चर्चा करण्यात आली. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पोलिस दल (एसआयटी) स्थापनेची घोषणा केली.
विधानसभेच्या कामकाजावेळी भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी काही प्रभावी नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये गोवण्यात येत असल्याचा विषय मांडला. त्यावर सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील आमदारांनी पक्षभेद विसरून चर्चा केली. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी हा विषय गंभीर असून यामागील सूत्रधार उघडकीस आला पाहिजे, असे सांगितले. एसआयटीकडे हे प्रकरण सोपवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी याविषयी संबंधितांनी गृहमंत्र्यांना लेखी तक्रार दिल्यास बरे होईल, असा सल्ला दिला. काही दिवसांपासून कर्नाटक हा सीडी आणि पेन ड्राईव्हचा कारखाना बनला आहे. यामागील दिग्दर्शक, निर्माता समोर येणे गरजेचे आहे. यामधील अभिनेते आणि अभिनेत्रींबाबतही कुतूहल आहे. सुमारे 48 जणांविरुद्ध सीडी, पेनड्राईव्ह आहेत. हनी ट्रॅपमध्ये त्यांना गोवण्यात आले आहे. राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी आणि मोठे पद मिळवण्यासाठीच असे करण्यात आले असेल, असा संशय त्यांनी व्यक्त केला. सामाजिक जीवनात काम करत असताना अशा प्रकारच्या प्रकरणात गोवणे किंवा ही परंपरा सुरू करणे खूप वाईट आहे. याचे दूरगामी परिणाम होतील. आपल्याकडे सर्व 48 नेत्यांची नावे आहेत. हवी तर ती जाहीर करता येतात; पण अशा प्रकरणात अडकल्यानंतर सामाजिक जीवनात त्याच प्रतिष्ठेने जगता येत नाही. कोणत्यातरी राजकीय फायद्यासाठी असे करण्यात आले आहे. राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाईल, असा विचार कधीच केला नव्हता. पण, हे खरे आहे. याविरुद्ध चौकशी करून संबंधितांवर नियंत्रण आणणे ही सरकारकडे विनंती असल्याचे ते म्हणाले.
भाजप नेते सुनीलकुमार यांनी हनी ट्रॅपसारख्या गैरमार्गाने पद मिळवणे किती योग्य आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. 48 जणांविरुद्ध हनी ट्रॅप करणे हा विषय गंभीर आहे. हा सर्व आमदारांच्या मानाचा प्रश्न आहे. राजकीय विरोधकांना पक्षाच्या धोरणाने आणि आपल्या समाजकार्यातून योग्य उत्तर द्यावे; पण गैरमार्गाचा वापर करू नये. कधीतरी हे उघड होणार असून त्यावेळी संबंधितांची राजकीय गच्छंती सुरू होईल. याबाबत योग्य तपास करण्याची मागणी त्यांनी केली. गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांनी या चर्चेनंतर प्रकरण गंभीर असल्याने एसआयटी स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. संपूर्ण देशात कर्नाटक विधिमंडळाचे स्थान मोठे आहे. कर्नाटकातून अनेक मोठे नेते उदयास आले. सभागृह आणि आमदारांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे हनी ट्रॅपमागील सूत्रधार समोर यावा म्हणून एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे ते म्हणाले.