आप्पाचीवाडी फाट्यानजीक मालवाहू ट्रकचा अपघात: पालघरच्या तरुणाचा जागीच मृत्यू | पुढारी

आप्पाचीवाडी फाट्यानजीक मालवाहू ट्रकचा अपघात: पालघरच्या तरुणाचा जागीच मृत्यू

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आप्पाचीवाडी फाटा येथे भरधाव आयशर मालवाहतूक ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने अज्ञात वाहनाला जोराची धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात चालक सुरेंद्र चव्हाण (वय २२, रा.पालघर) हा तरुण जागीच ठार झाला. या अपघाताची भीषणता इतकी होती की वाहनात अडकून पडलेला सुरेंद्र याचा मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. सोमवारी रात्री आठच्या सुमारास झालेल्या अपघाताची ग्रामीण पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, चालक सुरेंद्र चव्हाण याचा मालवाहू ट्रक पुणे-बेंगलोर महामार्गाने मुंबई येथे वाहनाचे पार्ट भरून जात होता. हा ट्रक आप्पाचीवाडी फाटा येथील भुयारी मार्गावर आला असता रस्ता उतारावर चालक सुरेंद्र याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे पुढे निघालेल्या वाहनाला जोराची धडक बसली. दोन्ही वाहनांच्या धडकेत सुरेंद्र चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल औताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना पाचारण केले. त्यानुसार घटनास्थळी सीपीआय एस.सी.पाटील, उपनिरीक्षक रमेश पोवार यांच्यासह पोलिसांनी धाव घेऊन वाहनात अडकून पडलेला सुरेंद्र याचा मृतदेह बाहेर काढून ओळख पटवली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Back to top button