बेळगाव : शहीद हणमंत सारथी यांना साश्रुपूर्ण निरोप | पुढारी

बेळगाव : शहीद हणमंत सारथी यांना साश्रुपूर्ण निरोप

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : मध्य प्रदेशातील मोरेना हवाई तळावर सराव करत असताना सुखोई ३० आणि मिराज – २००० या दोन लढाऊ विमानांना अपघात होऊन शहीद झालेले विंग कमांडर हणमंत रेवनसिद्धप्पा सारथी यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात रविवारी सायंकाळी ५ वा. बेनकनहळ्ळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मोरेना हवाई तळावर शनिवारी लढाऊ विमानांचे प्रशिक्षण सुरू असताना विमानांची धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत ते शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव वायुदलाच्या विशेष विमानाने रविवारी आणण्यात आले. येथील सांबरा विमानतळावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी वायुदल अधिकारी, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिस प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

पार्थिव घेऊन वायुदलाचे विशेष विमान १२.३० वाजता सांबरा विमानतळावर आले. अंत्यदर्शनासाठी विमानतळावर पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी आ. अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील, पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जि.पं. कार्यकारी अधिकारी एच. व्ही. दर्शन आदींनी पुष्पचक्र अपर्ण करून श्रद्धांजली वाहिली. यानंतर पार्थिव विंग कमांडर हणमंत सारथी यांच्या गणेशपूर येथील निवासस्थानाकडे पाठविण्यात आले.
यावेळी त्यांचे आई- वडील, पत्नी, मुलांसह नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, खा. मंगल अंगडी, मंत्री शशिकला जोल्ले, माजी आ. संजय पाटील, धनश्री सरदेसाई यांनी हणमंत सारथी यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. हणमंत सारथी यांच्या घरापासून बेनकनहळ्ळी स्मशनभूमीपर्यंत श्रध्दांजली फलक लावण्यात आले होते. तसेच रस्त्यावर रांगोळ्या रेखाटून श्रध्दांजली वाहण्यात आली. वायुदलाचे जवान व मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी बेनकनहळ्ळी परिसरातील नागरीकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

Back to top button