बेळगाव : सत्ता टिकवणे हेच भाजपचे लक्ष्य | पुढारी

बेळगाव : सत्ता टिकवणे हेच भाजपचे लक्ष्य

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा ; दक्षिण भारतात कर्नाटक वगळता कोणत्याही राज्यात भाजपची सत्ता नाही. येथे सत्ता टिकवली तरच पुढील वाटचाल सोपी होणार असल्याने भाजप श्रेष्ठींनी पूर्णपणे कर्नाटकावर लक्ष केंद्रित केले आहे. पक्षातील अंतर्गत मतभेद मिटवणे, एकगठ्ठा मते मिळवणे, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात जोरदार प्रचार करुन भाजपचा झेंडा फडकवण्यासह विविध डावपेच आखण्यात आले आहेत. त्यासाठीच पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांचा दौरा आयोजित केला आहे.

मार्चच्या दुसर्या आठवड्यात विधानसभा निवडणूक घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी मतदारांवर प्रभाव पाडण्याची सर्व तयारी भाजपने केली आहे. बेळगावसह मुंबई-कर्नाटक भाग आणि उत्तर कर्नाटकावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. केएलई बीव्हीबी कॉलेजच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी लिंगायत मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. धारवाडमध्ये फॉरेन्सिक विद्यापीठ कॅम्पससाठी कोनशिला बसवली. देशात आतापर्यंत ८ राष्ट्रीय फॉरेन्सिक विद्यापीठे आहेत. दक्षिण भारतातील पहिले फॉरेन्सिक विद्यापीठ धारवाडमध्ये निर्माण होणार आहे. त्यासाठी कर्नाटक विद्यापीठ, कृषी आणि कायदा विद्यापीठाच्या आवारात ४२ एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. याद्वारे युवा मतदारांना आकर्षित केले आहे.

बेळगावातील ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघांत भाजप, २ मतदारसंघांत काँग्रेस आमदार आहेत. येथे भाजप नेत्यांमध्ये एकजूट राखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जारकीहोळी विरुद्ध सवदी असे चित्र आहे. त्यावर ब्रेक लावण्यासाठी सर्व तयारी केली आहे. धारवाडमध्ये ५ भाजप २ काँग्रेस आमदार आहेत. येथे प्रल्हाद जोशी केंद्रीय मंत्री असले तरी जगदीश शेट्टर आणि अरविंद बेल्लद यांच्यात शीतयुद्ध आहे. हावेरीमध्ये ६ पैकी ४ काँग्रेस आणि २ भाजप आमदार आहेत. येथे किमान ४ जागा जिंकण्याचे ध्येय आहे. गदगमध्ये ३ भाजप आणि एक काँग्रेस आमदार आहे. या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील यांना पराभूत करुन गदगमधील सर्व जागा जिंकण्यासाठी डावपेच आखण्यात आले आहेत.

कुंदगोळ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथे भाजपचे वातावरण तयार करण्यासाठी अमित शहा यांनी रोड शोचे आयोजन केले. त्यास भरपूर प्रतिसाद मिळाला. तेथे त्यांनी विजय संकल्प अभियानाला चालना दिली. सभासद नोंदणीसाठी पत्रके वाटली. विधानसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांचे अनेक दौरे होणार आहेत. विविध योजनांचा प्रारंभ, जाहीर सभा व इतर कारणांसाठी ते कर्नाटकाच्या दौर्यावर येत आहेत.

डावपेच आखण्यास प्रारंभ

अमित शहा यांचे शुक्रवारी रात्री उशिरा आगमन झाले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नेत्यांशी उशिरापर्यंत चर्चा केली. पक्ष संघटना, पक्षातील मतभेद दूर करणे, भाजपची सत्ता पुन्हा आणणे, बेळगावसह मुंबई – कर्नाटक भागात अधिकाधिक जागा जिंकणे अशा विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. दक्षिण भारतात एकमेव कर्नाटकातील सत्ता टिकवण्याबाबत डावपेच आखण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Back to top button