बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याविरुद्ध विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोम्मई हे नरमाईने वागतात, असे सांगत असताना सिद्धरामय्यांनी बळ्ळारीत आक्षेपार्ह विधान केले. या विधानाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत असून, राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.
सिद्धरामय्या विजयनगरच्या दौऱ्यावर असताना त्यांची जीभ घसरली. ते म्हणाले, काही दिवसांपासून मुख्यमंत्री बोम्मई विरोधी पक्षांना आव्हान देत आहेत. नेहमीच ते 'हिंमत असेल तर..' असे विधान करतात; पण फक्त कर्नाटकातच ते अशी जाहीर विधाने करत आहेत. दिल्लीत गेल्यानंतर पंतप्रधान मोदींसमोर ते घाबरतात. मोदींसमोर त्यांचा थरकाप उडतो. 'ऑपरेशन कमळ' द्वारे भाजपने राज्यात सत्ता मिळवली आहे.
या सरकारचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केंद्राकडून कर्नाटकसाठी अपेक्षित निधी आणावा. तशी हिंमत त्यांच्यात आहे असे वाटत नाही. राज्यात विकासकामांसाठी केंद्राकडून निधी दिला जात नाही. कर्नाटकातील २५ खासदार यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत.
भाजप सत्तेवर आल्यानंतर पाटबंधारे योजनांकडे प्रचंड दुर्लक्ष झाले. फेब्रुवारी २०२० मध्ये म्हादई योजनेबाबत राजपत्रित अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यावेळी योजनेचा खर्च ९३ कोटी रुपये होता. आता हा खर्च १, ६७७ कोटींवर गेला आहे. दोनच वर्षांत पंधरा पटींनी खर्च वाढण्याचे कारण काय, असा प्रश्न सिद्धरामय्यांनी उपस्थित केला.
सिद्धरामय्यांनी केलेल्या टीकेवर अनेक नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. परिवहन मंत्री बी. श्रीरामुलू यांनी एका उच्च स्थानावर असणाऱ्या नेत्याने अशी टीका करू नये, असे मत व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांची संस्कृती दिसून येत असल्याचे ते म्हणाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील, आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर, राजकीय सल्लागार एम. पी. रेणुकाचार्य तसेच काही मंत्री आणि आमदारांनी सिद्धरामय्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
एका ज्येष्ठ नेत्याकडून खालच्या पातळीवर टीका होणे राज्याचे दुर्दैव आहे. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची संस्कृती, त्यांची वर्तणूक काय आहे ते त्यांच्या बोलण्यातून दिसते. त्यांनी मला काहीही म्हटले तरी मी जनतेसाठी प्रामाणिक काम करत आहे. त्यांच्या विधानाला जनताच उत्तर देईल. – बसवराज बोम्मई, मुख्यमंत्री
सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध केलेल्या टीकेची माहिती नाही. सिद्धरामय्या नेमके काय बोलले ते माहीत नाही.
– डी. के. शिवकुमार, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस