बेळगाव : शिवरायांना अभिवादन करुन सीमावासीय कोल्हापूरकडे रवाना | पुढारी

बेळगाव : शिवरायांना अभिवादन करुन सीमावासीय कोल्हापूरकडे रवाना

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा;  छत्रपती शिवरायांना अभिवादन, सीमा लढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण आणि भारलेल्या वातावरणात हजारो सीमावासीयांनी न्यायासाठी आज कोल्हापूरकडे कूच केली. कर्नाटकी पोलिसांकडून होणारी मुस्कटदाबी, जिल्हा प्रशासनाचा सावत्रभाव आणि महाराष्ट्रकडून सातत्याने होणारे दुर्लक्ष यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांना जागे करण्यासाठी दिलेल्या चलो कोल्हापूर नाऱ्याला सीमावासियांचा चांगला प्रतिसाद लाभला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून तापला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्‍मई सीमा प्रश्नावरून आणि महाराष्ट्र एकीकरण समितीवरून बेताल वक्तव्य करत आहेत. कानडी संघटना चिथावणी देत आहेत. महाराष्ट्राच्या वाहनांना लक्ष्य केले जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना विनाकारण अटक केली जात आहे. कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनात आयोजित मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला ऐनवेळी परवानगी रद्द करण्यात येत आहे. मराठी नेत्यांवर पाळत ठेवून जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत आहे.

सीमा भागात मराठी भाषिकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत असताना महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेते मात्र पोकळ आश्वासने देऊन हात वर करत आहेत. गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दोन्ही मुख्यमंत्री यांची बैठक घेऊन विविध सूचना केल्या, तरी कर्नाटकाकडून त्या सूचनांना हरताळ फासण्यात येत आहे. याकडे महाराष्ट्राने दुर्लक्ष केल्यामुळे सिमावासियांत असलेला संताप चलो कोल्हापूरच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.

सकाळी आठ वाजता शहापूर येथील शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. तर पश्चिम भागातून येणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी आणि आणि कार्यकर्त्यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन केले. यावेळी हुतात्मे अमर रहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी, सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण बरमणी, चंद्राप्पा, पोलीस निरीक्षक दयानंद शेगुनशी आदींच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

सकाळी साडेनऊ वाजता बेळगावातून कोल्हापूरकडे महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते रवाना झाले. विविध ठिकाणचे कार्यकर्ते कोल्‍हापूरला जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर एकत्र येत होते.

हेही वाचा : 

Back to top button