‘आम्ही विकासकामांच्या पाट्या लावल्या नाहीत’ : काकासाहेब पाटील | पुढारी

'आम्ही विकासकामांच्या पाट्या लावल्या नाहीत' : काकासाहेब पाटील

सौंदलगा : पुढारी वृत्तसेवा :  आपल्या कार्यकाळात झालेल्या काळम्मावाडी करारामुळे निपाणी परिसरातील शेती सुजलाम् सुफलाम् बनली असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला आहे. आम्ही केलेल्या काळम्मावाडी पाणी योजनेचा करार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. निपाणी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कार्य केले आहे. कोगनोळी व सौंदलगा गावांमध्ये दोन जलनिर्मल योजनाही आपण राबविल्या होत्या. जनतेच्या सेवेसाठी सदैव कार्य केले. आम्ही विकासकामांच्या पाट्या लावल्या नाहीत, असे प्रतिपादन माजी आ. काकासाहेब पाटील यांनी केले.

येथील ग्रामदैवत लक्ष्मी नृसिंह मंदिरात दत्त जयंतीनिमित्त दर्शन घेऊन आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. वीरकुमार पाटील होते. काकासाहेब पाटील पुढे म्हणाले, रस्ते चांगले असल्यास गावांचा विकास होतो. डोंगरभागातील गावांचे रस्ते आपल्या कार्यकाळात केले. त्यामुळे या गावांचा आता विकास झाला आहे. कार्यकर्त्यांनी एकजूट राहावे. पक्षासाठी आणि पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांच्या पाठबळावर नेहमी कार्यरत आहे.

वीरकुमार पाटील यांनी, काळम्मावाडी पाणी करार केल्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांतील शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काकासाहेब पाटील हेच काँग्रेसचे उमेदवार असतील. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. राज्यात काँग्रेस सत्तेवर येईल, असे सांगितले. माजी जि.पं. उपाध्यक्ष पंकज पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनीही मनोगत केले.
प्रारंभी शशिकांत पाटील यांनी स्वागत केले. यावेळी दिलीप शेवाळे, विकास मेस्त्री, टी. के. शिंदे, सुशील पाटील, शशिकांत पाटील, बसवराज पाटील, पुंडलिक भेंडूंगळे, दत्तात्रय पाटील, हरी इनामदार, अरुण शिंदे, चंद्रकांत पाटील, अजित कदम, बजरंग पाटील, सीताराम पाटील, बाबुराव खोत आदी उपस्थित होते.

Back to top button