बेळगाव : प्रियकराकडून प्रेयसीच्या पतीचा खून; तिघांना अटक | पुढारी

बेळगाव : प्रियकराकडून प्रेयसीच्या पतीचा खून; तिघांना अटक

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : ते दोघे बेळगावचे. त्या दोघांचे प्रेम होते. तरीही तिने गोकाकच्या तरुणाशी लग्न केले; मात्र लग्नानंतर ती वारंवार पतीबरोबर भांडून बेळगावला येऊन राहू लागली. प्रियकराला भेटू लागली. अखेर प्रियकराने तिच्या पतीचा काटा काढला; मात्र २४ तासांतच पोलिसांनी छडा लावत खून करणारा प्रियकर, त्याचा मित्र आणि प्रेयसी अशा तिघांना अटक केली.

अटक केलेल्या संशयितांमध्ये महंमदरझा नूर अहंमद इनामदार (वय २४, रा. सातवा क्रॉस, रुक्मिणीनगर, बेळगाव), त्याचा मित्र रोशनजमीर फिरोज शेख (वय २२, रा. आसदखान सोसायटी, बेळगाव) व मृताची पत्नी सना बेन्नी (वय २२, रा. मक्कळकेरी, ता. गोकाक ) यांचा समावेश आहे.

मारीहाळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी : शहरातील वैभवनगर येथील तरुणीचा चार वर्षांपूर्वी मक्कळकेरी (ता. गोकाक ) येथील रमजान बशीर अहंमद बेन्नी याच्याशी विवाह झाला होता. त्यांना अडीच वर्षांचा मुलगा आहे. लग्नापूर्वी सनाचे महंमदरझा याच्याशी प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही ती सातत्याने पतीशी भांडण काढून वैभवनगरला माहेरी येत होती. यानंतर ती आपल्या प्रियकराला भेटत होती. ती सातत्याने माहेरी जात असल्याने रमजान वैतागला होता.

पंधरा दिवसांपूर्वी पतीशी भांडून सना पुन्हा वैभवनगरला आली होती. यावेळी ती परत जाणार नसल्याचे प्रियकराला सांगत होती. आपल्या प्रेमाला अडसर ठरणाऱ्या पतीलाच संपवण्याचा डाव या दोघांनी आखला. २ डिसेंबर रोजी तिने, सासरी येतो न्यायला या, असा फोन पती रमजानला केला. रमजान मक्कळकेरीहून तुम्मरगुद्दीमार्गे येणार असल्याचे तिने आपल्या प्रियकराला आधीच सांगितले होते.

सनाचा प्रियकर महंमदरझा आपला मित्र रोशनजमीर याला घेऊन तुम्मरगुद्दीत जाऊन जंगलाच्या वाटेवर दबा धरून बसला. रमजान येत असताना त्याला वाटेत अडवले. यावेळी यावेळी महंमदरझाने रमजानला ‘सनाला सोडून दे, मी तिच्याशी लग्न करणार आहे’, असे सांगितले. यावेळी दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर दोघांनी त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. या खुनाच्या घटनेची मारीहाळ पोलिसांत नोंद झाली होती.

पोलिस निरीक्षक महांतेश बसापुरे यांनी तपास करत अवघ्या चोवीस तासांत मृताची पत्नी, तिचा प्रियकर व प्रियकराचा मित्र अशा तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली.

Back to top button