पुढारी वृत्तसेवा : निपाणी; मधुकर पाटील : सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील व शंभूराज देसाई यांचा आज (मंगळवार) होणारा बेळगाव दौरा रद्द झाला असला, तरी कर्नाटक सरकारने खबरदारी घेतली असल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकच्या पोलिसांकडून कर्नाटक-महाराष्ट्रच्या कोगनोळी सीमेवर खबरदारी घेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी सुरू ठेवली आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात प्रवेश द्यावयाचा नाहीच, यावर कर्नाटक सरकार ठाम आहे. याचाच एक भाग म्हणून खबरदारी घेत सीमाभागातील 21 तपासणी नाक्यांवर खडा पहारा ठेवला आहे.
दरम्यान, यातूनच जर मंत्री बेळगावला येणार असतील तर, कोणत्याही परिस्थितीत कोगनोळी सीमेवर कर्नाटक हद्दीत महामार्ग रोखण्याची तयारीही पोलीस प्रशासनाने केली आहे. सीमाप्रश्न ही न्यायप्रविष्ट बाब आहे. असे असले तरी सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराजे देसाई यांचा आजचा (मंगळवार) बेळगाव दौरा निश्चित होता, मात्र सीमा भागात तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे मंत्र्यांचा दौरा रद्द झाला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून पोलीस प्रशासनाने कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कोगनोळी येथे मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. या शिवाय सीमावर्ती भागातील 21 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. दरम्यान पाटील व देसाई हे बेळगावला येण्याबाबत अनिश्चितता आहे. तरीही खबरदारी म्हणून कर्नाटक पोलीस प्रशासनाने खडा पहारा, वाहनांची कसून तपासणी सुरूच ठेवली आहे.
विशेष म्हणजे आज (मंगळवार) महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काहीकाळ कोगनोळी हद्दीत महामार्ग रोखण्याची सर्व ती तयारी केली होती. शिवाय गेल्या दोन-तीन दिवसात पोलीस प्रशासनाने दौऱ्यावर येणाऱ्या मंत्र्यांच्या सीमाभागातील नातेवाईकांचीही सर्व ती माहिती मिळविली आहे. नातेवाईकांचे निमित्त करून हे मंत्री येऊ शकतात का? या शक्यतेवरही प्रशासन सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते. एकूणच मंत्र्यांचा दौरा रद्द झाला तरी पोलीस प्रशासनाने मात्र खबरदारी घेत सीमेवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महालिंग नंदगावी यांनी कोगनोळी सीमा तपासणी नाक्याला भेट दिली. यावेळी त्यांनी बंदोबस्ताबाबत योग्य त्या सूचना देऊन परिस्थितीची पाहणी केली.
सीमेवर असा आहे बंदोबस्त
मंत्र्यांचा दौरा अनिश्चित झाला असला, तरी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीमाभागातील 21 तपासणी नाक्यांसह कर्नाटक-महाराष्ट्र कोगनोळी सीमेवर आज (मंगळवार) सकाळपासून पोलिसांची ज्यादा कुमक मागवली आहे. यामध्ये 1 जिल्हा पोलीस प्रमुख, 1 अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख, 8 उपाधीक्षक (डीएसपी) 35 उपनिरीक्षक तसेच 450 पोलीस कर्मचार्यांसह 6 राज्य राखीव दलाच्या, तर 5 जिल्हा सशस्त्र दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
संगमेश शिवयोगी
सीपीआय निपाणी.