बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : मी निपाणीतील कार्यक्रमात हिंदू या शब्दाचा फारसी भाषेतील अर्थ काय आहे, यावर चर्चा व्हावी, असे म्हटले होते. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी मी माझी टिप्पणी मागे घेत असून, कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्याबरोबरच या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करावी, असे पत्रक कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी जारी केले आहे.
निपाणीत गेल्या रविवरी मानव बंधुत्व वेदिकेकडून आयोजित 'जागर महापुरुषांच्या विचारांचा' या कार्यक्रमात आ. जारकीहोळी यांनी हिंदू शब्दाचा पार्शियन भाषेत देण्यात आलेल्या अर्थाबद्दल टिप्पणी केली होती. मंगळवारी जारी केलेल्या पत्रकात जारकीहोळी यांनी म्हटले आहे की, हिंदू या शब्दाचा भारताशी कसा संबंध आला? तो परका शब्द आहे. स्वामी दयानंद सरस्वती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह अनेक लेखकांनी त्या शब्दाचा अर्थ सांगितला आहे, असेच मी म्हटले होते.
शिवाय त्यावर चर्चा व्हावी, असे सुचवले होते. मी विकिपिडिया, अनेक लेखकांची पुस्तके आणि शब्दकोषात जो अर्थ आहे, त्यावरूनच टिप्पणी केली होती; मात्र त्याचा विपर्यास करण्यात आला. विरोधकांनी माझा अपमान करण्याच्या उद्देशाने अपप्रचार चालविला आहे. मी हिंदूविरोधी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आहे; पण मला सर्व धर्म सारखे आहेत. मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, तरीही माझ्या टिप्पणीमुळे भावना दुखावल्या असतील, तर मी दिलिगिरी व्यक्त करतो. मी माझे शब्द मागे घेतो
समिती स्थापन करा
माझ्या वक्तव्य प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यासाठी समितीची नेमणूक करावी, अशी मागणी आ. सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली आहे. तसे पत्र त्यांनी लिहिले आहे.