बेळगाव : प्रवाशांना लुटणार्‍या रिक्षा जप्त करा | पुढारी

बेळगाव : प्रवाशांना लुटणार्‍या रिक्षा जप्त करा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  प्रवाशांची लूट करणार्‍या रिक्षा जप्त करुन त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा, असा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी वाहतूक नियंत्रण विभागाच्या पोलिस उपायुक्त स्नेहा पी. व्ही., उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट करण्यात येत आहे. याबाबत अनेक तक्रारी येत आहेत. ऑटोरिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ऑटोरिक्षा चालकांनी मीटर बसवणे आवश्यक आहे. मीटर बसवल्यानंतरच भाडेदरात सुधारणा करून योग्य तो दर निश्चित केला जाईल.

ऑटोरिक्षाचे सध्याचे किमान भाडे 25 रुपये प्रति 1.5 किमी आहे. मात्र काही रिक्षावाले जादा दर आकारून प्रवाशांची पिळवणूक करत आहेत. अशा ऑटोरिक्षा जप्त करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. प्रवाशांकडून रोज अनेक तक्रारी येत आहेत. अवघ्या दीड किमीसाठी ऑटोरिक्षा चालक 150 ते 200 रुपये भाडे घेत आहेत. त्यामुळे सर्व रिक्षांना तातडीने मीटर बसवावेत. ऑटोरिक्षा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी संघटनेच्या सदस्यांना तात्काळ नोटीस देण्यात याव्यात. रिक्षा चालकांनी मीटर बसविल्यानंतरच सुधारित दर निश्चित केले जातील, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले.

बैठकीस एसटी परिवहन, खासगी वाहतूक संघटनेचे आणि ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते रात्री प्रवाशांची लूट रात्री प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून ऑटोरिक्षा चालक मोठी लूट करत आहेत. याबाबतच्या तक्रारी ऐकून वैतागलो आहे, असे जिल्हाधिकारी पाटील म्हणाले. अशा प्रकारे लूट करणारे आढळून आल्यास ऑटो जप्त करून चालक परवाना रद्द करावा, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी पाटील यांनी यावेळी दिल्या.

Back to top button