

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा
उसाच्या शेतात पिकवलेला 27 किलो गांजा जप्त करण्यात आला. याची किंमत 1 लाख 35 हजार रुपये होते. याप्रकरणी गंगाप्पा मल्लाप्पा सन्निंगनवर (वय 43, रा. कुरूबगट्टी, ता. सौंदत्ती) याला अटक करण्यात आली. जिल्हा सीईएन विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली.
कुरूबगट्टी येथील शेतकरी गंगाप्पा याने त्याच्या शेतात गांजा पिकवल्याची माहिती जिल्हा सीईएनचे निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांना मिळाली. जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त पोलिस प्रमुख श्रृती एन. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जाऊन छापा टाकला असता उसाच्या मधोमध गांजाची झाडे असल्याचे निदर्शनास आले. तो एकत्रित केला असता 27 किलोची 18 झाडे असल्याचे आढळून आले. जप्त करून संबंधितावर गुन्हा दाखल केला. निरीक्षक नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एच. एल. धर्मट्टी, ए. एच. बजंत्री, टी. के. कोळची, एन. एस. मसरगुप्पी, एन. एल. गुडेन्नवर, एन. आर. घडेप्पन्नवर यांनी ही कारवाई केली.