बेळगाव : ‘मराठी’साठी मोर्चावर ठाम | पुढारी

बेळगाव : ‘मराठी’साठी मोर्चावर ठाम

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा मराठी कागदपत्रे मिळवणे आमचा हक्‍क आहे. पण, तो मिळत नाही. त्यामुळे आम्ही प्रशासन आणि सरकारला जागे करण्यासाठी मोर्चा काढणार आहोत. त्यासाठी 1 जून रोजीच कल्पना दिली होती. त्यामुळे आता मोर्चातून माघार घेणार नाही, असा ठाम निर्धार महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांनी पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्यासमोर व्यक्‍त केला. मराठी कागदपत्रांसाठी 27 जून रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाबाबत माहिती घेण्यासाठी डीसीपी स्नेहा यांनी शुक्रवारी (दि. 24) समिती नेत्यांची बैठक घेतली.

मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, सीमाभागातील मराठी जनतेला मराठीतून सरकारी कागदपत्रे, परिपत्रके मिळणे हा अधिकार आहे. कर्नाटकाचाच हा कायदा आहे. तो अंमलात आणावा, यासाठी आमचा मोर्चा आहे. यासाठी 1 जून रोजीच निवेदन दिले होते. मागण्यांच्या पूर्ततेसाठी 20 दिवसांचा अवधी दिला होता. पण, अद्याप आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे आम्ही पान 2 वर

नियोजनानुसार मोर्चा काढणार आहोत. त्यासाठी गावागावांत जनजागृती केली आहे. त्यामुळे आम्ही आता मोर्चातून माघार घेणार नाही.
आम्ही अनेक संघटनांना मोर्चा काढू नका, असे सांगितले आहे. त्यामुळे तुम्हीही मोर्चा काढू नका, अशी विनंती डीसीपी स्नेहा यांनी केली. त्यावर कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, आमचा मोर्चा पूर्वनियोजित आहे. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांशी चर्चाही झाली आहे. त्यामुळे आमच्या मागण्यांच्या या लढ्यात पोलिसांनी अडथळे आणू नयेत. सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी उपस्थित होते. एसीपी ए. चंद्रप्पा, सदाशिव कट्टीमनी, निरीक्षक दिलीप निंबाळकर, प्रभाकर धर्मट्टी उपस्थित होते.

कन्‍नड संघटनेला पोटशूळ
मराठी कागदपत्रांसाठी मराठी माणूस जागरूक होऊ लागल्यामुळे कन्‍नड संघटनांना पोटशूळ उठला आहे. त्यांनी शुक्रवारी (दि. 24) पोलिस आयुक्त डॉ. बी. एम. बोरलिंगय्या यांची भेट घेत म. ए. समिती नेत्यांना मोर्चाची परवानगी देवू नये, अशी कोल्हेकुई केली.

Back to top button