आ. रमेश जारकीहोळी फडणवीसांच्या भेटीला | पुढारी

आ. रमेश जारकीहोळी फडणवीसांच्या भेटीला

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. अशातच गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना ऊत आला. राज्यामध्ये सत्ताधारी भाजप सरकार सत्तेवर आणण्यात आ. रमेश जारकीहोळी यांचा सिंहाचा वाटा आहे. 2018 मध्ये निजद- काँग्रेस सरकारच्या काळात आ. रमेश जारकीहोळी यांनी बंड पुकारले होते. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राज्यात भाजप सरकार सत्तेत आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

यामध्ये त्यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी मदत केली होती. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या आमदारांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात बंड पुकारले आहे. त्यामुळे तेथील विरोधी पक्षात असणार्‍या भाजपला सत्तेत येण्याची संधी निर्माण झाली आहे. आ. रमेश जारकीहोळी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजप सरकार सत्तेवर आणण्यासाठी रमेश जारकीहोळी पुढाकार घेणार का, याबात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Back to top button