भय इथले संपणार कधी..? | पुढारी

भय इथले संपणार कधी..?

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा सतीश पाटील नामक युवकाचा खून, त्यानंतर झालेली प्रचंड जाळपोळ आणि त्यानंतर पोलिसांचा लाठीमार-धरपकड यामुळे गेले पाच दिवस गौंडवाडमध्ये प्रचंड तणाव असून, गावात नीरव शांतता आहे. गावातील पुरुष गायब असून, केवळ महिला आणि वृद्ध घरी आहेत. बहुतांशी घरे बंद असून, गल्ल्या निर्मनुष्य दिसतात. या गावात जणून लॉकडाऊनच झाला आहे. बाहेर दिसतात ते फक्त पोलिस आणि त्यांची वाहने. गौंडवाड येथे देवस्थान जमिनीच्या वादातून शनिवारी 18 जूनरोजी रात्री सतीश पाटील याच्यावर रॉडने खुनी हल्ला करण्यात आला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर गावात दंगल उसळळी, जाळपोळ झाली. पोलिसांनी दंगलखोरांवर लाठीमार करून गावातील परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर धरपकडीचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे गावातील तरुण परागंदा झाले आहेत.

त्यामुळे गावातील वर्दळ शून्य आहे. अनेक घरांना कुलूप लावण्यात आला आहे. तर गल्ल्या ओस पडल्या आहेत. अनेक घरांमध्ये केवळ वयोवृद्धांची हालचाल दिसून येत आहे. घरासमोरून कोणतेही वाहन गेल्यास खिडक्यांमधून लोक डोकावून पहात आहेत. कोणीही घराबाहेर पडण्यास धजावत नाही, असे चित्र आहे. घरासमोर लावण्यात आलेली वाहने, ऊन -पावसात तशीच उभी आहेत. गावातील मध्यवर्ती भागातील अनेक घरांना कुलूप आहे. रोजंदारी करून उदरनिर्वाह चालवणारेही अनेकजण घरांना कुलूप लावून गावाबाहेर गेले आहेत. सारी दुकाने बंद आहेत. त्यामुळे भय इथले संपणार कधी, हाच प्रश्न आहे.

सुजाण नागरिकांची माणुसकी

गावामध्ये उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. अनेक घरामध्ये केवळ वयोवृद्ध नागरिक आहेत. तर काही घरात कोणीच नाही. अशा परिस्थितीत काही सुजाण नागरिक जनावरांना चारा घालून माणुसकी जपत आहेत. ते लोक वयोवृद्धांनाही मदत करत आहेत. अनेकांचा शोध जारी सतीश पाटीलचा खून झाल्यानंतर ग्रामस्थांनी वाहने जाळून अनेक घरांवर दगडफेक केली. गवत गंज्याही जाळल्या. काकती पोलिसांनी आतापर्यंत 30 जाणांना अटक केली असून अनेकजणांचा शोध जारी ठेवला आहे.

दुभत्या जनावरांचे दूध काढणार कोण? शेतीकाम ठप्प

गावामध्ये शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय केला जातो. जनावरे पळणार्‍यांची संख्या मोठी आहे. मात्र जनावरांचे नियमित दूध काढणारे पुरुष नसल्यामुळे दुधाची धार काढणे अशक्य झाले आहे. त्यामुळे घराघरातील दुभती जनावरे आरडाओरड करत आहेत. शिवाय सध्या सर्वत्र पेरणीचा हंगाम सुुरु आहे. गौंडवाडमध्ये मात्र कोणतीच लगबग दिसत नाही. शेतवडीत कोणीच दिसत नाही. त्यामुळे यंदा खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे.

फक्त शाळा परिसरात किलबिल

गावात नीरव शांतता पसरली आहे. मात्र फक्त शाळेच्या आवारात मुलांचा किलबिलाट ऐकू येतो. दंगलीच्या घटनेपासून अजाण असणारी शाळकरी मुले नेहमीप्रमाणे शाळेला जात आहेत. मात्र येता-जाता उघडी असणारी खाऊची दुकाने बंद असल्याने मुले नाराज आहेत. तर खाकी वर्दीतील पोलिसांना पाहून नेहमीप्रमाणे मुलांचे गल्लीतील बागडणे, फिरणे, खेळणेही बंद झालेे आहे.

Back to top button