

खानापूर : गेल्यावर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये नंदगड (ता. खानापूर) पोलिस स्थानकाच्या व्याप्तीमधील चार वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून स्वतःच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केलेल्या निसारअहमद फकरुसाब चापगावी (68, रा. काकर गल्ली नंदगड) या आरोपीला वीस वर्षांचा कारावास आणि दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
याप्रकरणी नंदगड पोलिसांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी नंंदगड पोलिस स्थानकात त्याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिस निरीक्षक एस. सी. पाटील यांनी 17 एप्रिल 2024 रोजी पोक्सो न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या प्रकरणातील आरोपीला 28 फेब्रुवारी 2024 रोजी न्यायालयात हजर करून सहाय्यक तपास अधिकारी आर. एस. केमाले यांनी तपास हाती घेतला होता. याबाबत बेळगाव येथील पोक्सो न्यायालयात न्या. सी. एम. पुष्पलता यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत आरोपी निसारअहमद याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने वीस वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.