

हुक्केरी : अन्नभाग्य योजनेतील तांदळाचा बेकायदेशीर साठा करून तो कोल्हापूरला नेला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर हुक्केरी पोलिसांनी कारवाई करत १७८० किलो तांदूळ जप्त केला. याप्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
हुक्केरी तालुक्यातील बेनिवाड येथील प्राथमिक कृषी पतसंस्थेजवळ अन्नभाग्य योजनेचा तांदूळ अवैधरित्या वाहतूक केला जात असल्याची माहिती ११२ आपत्कालीन सेवेद्वारे प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ट्रकमधून ४६ पोत्यांमध्ये तांदूळ भरलेला आढळून आला. सदर वाहन हुक्केरी पोलिस ठाण्यात आणून आहार निरीक्षक प्रवीणकुमार सागर यांच्या उपस्थितीत माहिती घेण्यात आली. त्यानंतर ४६ पोत्यांमधील तांदळाचे वजन करण्यात आले असता एकूण १७८० किलो तांदूळ असल्याचे निष्पन्न झाले. जप्त तांदळाची अंदाजे किंमत ३५ हजार ६०० रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
याप्रकरणी निंगराज मल्लाप्पा मुगळी (वय २४, रा. बेनिवाड) या चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत त्याने जवळच्या गावांतील आठवडी बाजारातून हा तांदूळ खरेदी करून कोल्हापूर येथे नेत असल्याचे सांगितले आहे. घटनेची नोंद हुक्केरी पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.