बेळगाव : लग्नाच्या गाठी, दलालांच्या हाती | पुढारी

बेळगाव : लग्नाच्या गाठी, दलालांच्या हाती

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : लग्नाच्या गाठी थेट स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. परंतु, काळाच्या ओघात ही म्हण मागे पडली असून लग्न जुळवण्यासाठी दलालांची चलती वाढली आहे. लग्न जुळवण्यामध्ये दलालांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्याकडून यासाठी चांगला मोबदला वसूल केला जात आहे.

काही वर्षांपासून लग्न जुळवण्याचा व्यवसाय तेजीत आला आहे. गावागावांतील ज्येष्ठांकडून जुळवण्यात येणारी लग्ने मागे पडली आहेत. प्रेमप्रकरणे, मुलामुलींच्या आवडी-निवडी यामुळे गावातील ज्येष्ठ मंडळी लग्न जुळवण्यापासून चार पावले मागेच राहत आहेत. यामुळे लग्न जुळवताना वधू वरांच्या पालकांना कसरत करावी लागत आहेत.

गावागावांतून असे धंदेवाईक लग्न जुळवणारे तयार झाले आहेत. त्यांच्याकडे परिसरातील लग्नाळू मुला, मुलींची छायाचित्रे, माहिती उपलब्ध आहे. ते लग्न जुळवण्यासाठी 500 पासून दहा हजारपर्यंत रक्कम वसूल करत आहेत. काहीजण मुलगी दाखवण्यासाठीदेखील मोठ्या प्रमाणात पैसे उकळत आहेत.

परिणामी, लग्नासाठी मुलगा अथवा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आता महागला आहे. मुलगी दाखविल्यास 500 ते हजार रु. उकळण्यात येत आहेत. लग्न जुळल्यास याचा मोबदला 5 हजार ते 10 हजार रु. इतका घेण्यात येत आहे. यामुळे लग्नापूर्वीच मुलगा अथवा मुलगी पाहण्यासाठीच हजारो रुपयांचा खर्च करावा लागत आहे.

सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे. त्यामुळे गावातील दलालांची चलती सुरू आहे. अनेकजण अधिक रक्कम उकळण्यासाठी मुलगा अथवा मुलीची चुकीची माहिती देऊन लग्न जुळवण्याचा खटाटोप करत आहेत. यातून लग्नानंतर विघ्न निर्माण होत आहेत.

जाणत्यांचा पुढाकार कमीच

यापूर्वी लग्न जुळवण्यासाठी गावांतील अथवा गल्लीतील ज्येष्ठ पुढाकार घेत असत. परंतु, हा प्रकार कमी होत चालला आहे. वाढत्या प्रेमप्रकरणामुळे पुढाकार घेणार्‍यांची संख्या कमी झाली आहे.

Back to top button